स्वदिच्छा गायब झाली नेमकं त्याच रात्री फूडस्टॉलवर का थांबला अन्सारी?
By गौरी टेंबकर | Published: January 17, 2023 06:47 AM2023-01-17T06:47:36+5:302023-01-17T06:48:02+5:30
गुन्हे शाखेकडून गणेशनगर परिसरात राहणाऱ्या ८ ते १२ वयोगटातील चार ते पाच मुलांनादेखील चौकशीसाठी रविवारी बोलाविण्यात आले होते.
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : एमबीबीएसची विद्यार्थिनी स्वदिच्छा साने (२२) हिच्या बेपत्ता प्रकरणामध्ये गुन्हे शाखेने जीवरक्षक मिथू सिंग याच्यासह त्याचा मित्र अब्दुल जब्बार अन्सारी यालाही अटक केली आहे. अन्सारी हा कधीही फूडस्टॉलवर थांबत नव्हता. मात्र ‘त्या’ रात्री तो तिथे का थांबला? याचा तपास पोलिस करत आहेत.
सिंग हा अन्सारीसोबत गणेशनगर रहिवासी संघ बँडस्टँड येथे मीत किचन नामक फूडस्टॉल चालवतो. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, २९ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १ वाजून ९ मिनिटांनी स्वदिच्छा तेथे आली. सिंगने २ वाजून २५ मिनिटांनी सेल्फी काढले. स्वदिच्छा साने ही सिंगसोबत बँडस्टँडच्या खडकावर बसली असल्याचे समजल्यावर अन्सारीने सिंगला फोन करून तिच्याबाबत अश्लील वक्तव्य केले. अन्सारीवरील संशय वाढण्याचे अजून एक कारण म्हणजे तो रात्रीच्या वेळी फूडस्टॉलवर कधीच थांबत नव्हता. मात्र ज्या रात्री स्वदिच्छा गायब झाली नेमक्या त्याच रात्री तो तिथे थांबला होता. दोघांच्या मोबाइलची फॉरेन्सिक चाचणी होणार आहे.
‘त्या’ ४२ वाहनांचीही चौकशी
स्वदिच्छा साने ही सिंगला रात्री भेटली तेव्हापासून सकाळपर्यंत त्या परिसरातून ४२ दुचाकी गेल्याचे दिसते. त्या सर्व गाड्यांचे मालक व चालक यांना शोधून काढत त्यांचीही चौकशी करत सीसीटीव्ही पडताळण्यात आले. मात्र त्या फूटेजमध्येही ती अधिकाऱ्यांना दिसली नाही.
आयकार्डची मुलांकडे चौकशी!
गुन्हे शाखेकडून गणेशनगर परिसरात राहणाऱ्या ८ ते १२ वयोगटातील चार ते पाच मुलांनादेखील चौकशीसाठी रविवारी बोलाविण्यात आले होते. स्वदिच्छाची हुडी, मोबाइल, बॅग तसेच ओळखपत्राबाबत त्यांच्याकडे पोलिस चौकशी करत आहेत, तसेच सिंग कुटुंबातील सर्वांचे मोबाइल फोनदेखील हस्तगत करण्यात आले आहेत.
मृतदेह सापडला नाही तरी...
माझ्या दिराला तो आठ महिन्यांचा असल्यापासून मी ओळखते. मृतदेह सापडला नाही तरी त्या मुलीच्या हत्येचा आरोप त्याच्यावर केला जात आहे. त्याच्या नार्को आणि अन्य चाचण्यांमध्येही काही संशयास्पद आढळलेले नाही. आम्हाला आणि त्याच्या वकिलालादेखील त्याची भेट नाकारली जात आहे. त्यांनी मुलीची मदत केली, ते त्याच्या अंगाशी आले. - गंगा भागवत सिंग, मिथू सिंगची मोठी वहिनी