भिक्षा मागितली तर काय गुन्हा केला... मुलाची हत्या का केली...? मातेचा आर्त टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 11:52 AM2021-06-29T11:52:02+5:302021-06-29T11:52:14+5:30
Crime News : भिक्षा मागणे हा काय? गुन्हा आहे काय? असा आर्त टाहो रायगड जिल्ह्यात हत्या करण्यात आलेल्या नाथजोगी समाजाच्या इसमाच्या आईने फोडला.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : आमच्या कुटुंबातील तरूण बहुरूपींचा वेश परिधान करून गावोगावी फिरून भिक्षा मागतात. हे आमचे परंपरागत काम असून, अनेक वर्षांपासून आम्ही अशा प्रकारे भिक्षा मागत आहोत. मात्र भिक्षा मागण्यासाठी गेल्यावर माझ्या मुलाची हत्या करण्यात आली, भिक्षा मागणे हा काय? गुन्हा आहे काय? असा आर्त टाहो रायगड जिल्ह्यात हत्या करण्यात आलेल्या नाथजोगी समाजाच्या इसमाच्या आईने फोडला.
जळगाव जामोद तालुक्यातील मोहीदपूर व नाव खुर्द या गावात नाथजोगी समाजाचे नागरिक वास्तव्यास आहेत. या समाजातील तरूण बहुरूप्यांचा वेश परिधान करून गावोगावी जाऊन भिक्षा मागतात. अनेक वर्षांपासून पिढ्यांन पिढ्यांपासून ते हेच काम करीत आहेत.
अशाच प्रकारे तेजराव शालीग्राम सोळंके व तेजराव वामन चव्हाण त्यांच्या पत्नीसह रायगड जिल्ह्यात गेले होते.
तेथे तेजराव सोळंके व तेजराव चव्हाण भिक्षा मागण्याकरिता गावोगावी फिरत होते, सायंकाळी ते परत आपल्या ठिकाण्यावर येत होते. मात्र, १९ जून रोजी तेजराव सोळंके परतलेच नाहीत. त्यांचा तेजराव चव्हाण व पत्नी सुनीता यांनी शोध घेतला.
त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये हरविल्याची माहिती दिली. त्यानंतर उरण पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तेजराव चव्हाण सापडल्याची माहिती दिली.
तेजराव चव्हाण व सुनीता उरणच्या रूग्णालयात पोहोचले तर तेथे तेजराव सोळंके यांचा मृतदेहच त्यांना बघायला मिळाला. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. संपूर्ण शरीरावर मारहाण झाल्याचे दिसत होते. त्यानंतर तेजरावचा मृतदेह घेऊन पत्नी सुनीता व सहकारी मोहीदपूर गावात पोहोचले.
गावात मुलाचा मृतदेह बघितल्यावर आई रेश्मा यांनी एकच हंबरडा फोडला. संपूर्ण गावावरच दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, दु:खापेक्षाही त्यांच्या मनात चीड होती, ती कोणता गुन्हा केला याची? यापूर्वीही याची? गावातील तिघांची नागपूर येथे हत्या करण्यात आली होती. या घटनांमुळे समाजातील अनेकांनी रोष व्यक्त केला.
गुन्हा केला असेल तर पोलिसात द्या, हत्या का करता?
आमच्या समाजातील तरूण गावोगावी फिरतात. महिला व बहुरूप्यांचे वेश परिधान करतात. यात काय चुकीचे आहे? त्यांनी गुन्हा केला असेल तर पोलिसांकडे तक्रार करा, त्यांना पकडून द्या, त्यांना कायद्याने शिक्षा होऊ द्या, मात्र त्यांचे काहीही ऐकून न घेता चक्क हत्या का करता? देशात कायदा आहे? की नाही, हत्या करण्याएवढा कोणता गुन्हा ते करतात, असा सवाल मोहीदपूर गावातील महिलांनी केला आहे.
दहा दिवसांपासून पोलिसांचा तक्रार घेण्यास नकार
तेजराव सोळंके यांची रायगड जिल्ह्यात उरण येथे हत्या झाली. मात्र, उरण पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार देत, गावाला जावून तक्रार देण्याचे सांगितले. तेजराव यांचे नातेवाईक जळगाव जामोेद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांनी घटना उरण येथे घडली आहे, त्यामुळे तेथेच तक्रार देण्याचे सांगितले. घटना घडून दहा दिवस झाले तरी पोलीस तक्रार घेण्यास तयार नाहीत.
नागपूर येथे तीन तर राईनपाडा येथे पाच जणांची झाली होती हत्या
मोहीदपूर येथील तीन तरूणांची नागपूर येथे ९ मे २०१२ रोजी हत्या झाली होती. यावेळी अनेक आरोप हत्या झालेल्यांवर करण्यात आले होते. तसेच धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे १ ऑगस्ट २०१८ रोजी नाथजोगी समाजातील पाच जणांची हत्या करण्यात आली. यांच्यावरही विविध आरोप करण्यात आले होते. संशयातून या समाजातील नागरिकांची हत्या करण्यात येत आहे.