Anil Deshmukh Arrested: दिल्लीतून मोठ्या हालचाली! ...म्हणून अनिल देशमुखांना अटक करण्याचा निर्णय घेतला; ईडीने सांगितले कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 02:27 AM2021-11-02T02:27:08+5:302021-11-02T02:29:51+5:30
ED Arrested Anil Deshmukh: मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी सुमारे ५ वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. तब्बेत आणि वयाची कारणे देत अनिल देशमुख यांनी ईडीसमोर जाण्याचे टाळले, असे सांगितले जात आहे.
मुंबईतील बार, रेस्टॉरंटकडून दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी ईडीने राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मध्यरात्रीनंतर अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून देशमुख गायब झाले होते. न्यायालयांनी दिलासा न दिल्याने अखेर ते आज ईडीच्या कार्यालयात हजर झाले. (Anil Deshmukh arrested by ED)
मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी सुमारे ५ वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. तब्बेत आणि वयाची कारणे देत अनिल देशमुख यांनी ईडीसमोर जाण्याचे टाळले, असे सांगितले जात आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांच्या कार्यालय व घरावर पाचवेळा छापे टाकले. देशमुख यांनी आपल्यावरील कारवाई रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता.
मुंबईतील ईडीचे अधिकारी सकाळी 11.30 वाजल्यापासून अनिल देशमुखांची चौकशी करत होते. देशमुखांसोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे देखील ईडी कार्यालयात गेले होते. अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात आल्याचे कळताच दिल्लीच्या मुख्यालयात मोठ्या हालचाली सुरु झाल्या होत्या. सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक दिल्लीहून ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार मुंबईत दाखल झाले आणि सारी सूत्रे वेगाने फिरली.
अनिल देशमुख अनेक प्रश्नांना नकारार्थी उत्तरे देत होते. यामुळे देशमुख माहिती लपवत असल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आला. त्यातच दिल्लीतील मोठा अधिकारी आल्याने अनिल देशमुखांच्या अटकेत्या कारवाईला वेग आला. अनिल देशमुख चौकशीला सहकार्य करत नसल्याने ईडीने त्यांना अटक करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. माजी गृहमंत्री देशमुख यांची दिवाळी ईडीच्या कोठडीत जाणार आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
संबंधीत बातम्या...
Anil Deshmukh Arrested: मोठी बातमी! 13 तासांच्या चौकशीनंतर अखेर अनिल देशमुखांना ED कडून अटक
लकी ते अनलकी! जिल्हा परिषद सदस्य ते गृहमंत्री अन् आता ईडीच्या अटकेत, अनिल देशमुख यांचा प्रवास