अभिनेत्यांमागेच का पोलिसांचा ससेमिरा?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 05:50 AM2020-09-21T05:50:48+5:302020-09-21T05:51:05+5:30
ड्रग प्रकरण : चित्रपट उद्योगांतून प्रतिक्रिया
बंगळुरू : अमलीपदार्थाचे सेवन आणि कारभाराविरुद्ध पोलिसांनी कन्नड चित्रपट उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींविरुद्ध कारवाईचा सपाटा लावला असून आतापर्यंत दोन अभिनेत्रींसह १३ जणांना अटक केली आहे. या प्रकरणावरून कन्नड चित्रपट उद्योगांतून पोलिसांविरुद्ध प्रतिक्रिया उमटत आहे. पोलिसांचा फक्त अभिनेते, अभिनेत्रींच्याच मागे ससेमिरा का? राजकारण्यांविरुद्ध का नाही? असा सवाल केला जात आहे.
चित्रपट उद्योगातील लोकांवर लक्ष केंद्रित केले जात असल्याने खरे गुन्हेगार सुटू शकतात, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
सामाजिक घडी बिघडविण्यास महिलाच अधिक जबाबदार असतात, हा गैरसमज धोकादायक आहे, असे अभिनेता चेतन अहिंसाने म्हटले आहे.
अभिनेत्री शर्मिला मांद्रेचे नावही टीव्हीवरील एका वृत्तात घेण्यात आले होते. या निराधार आरोपांनी आणि ड्रग प्रकरणाशी माझा संबंध जोडल्याने मी खूप व्यथित झाले. तिने अलीकडेच सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ४ एप्रिल रोजीच्या कार अपघाताबाबत माझ्याविरुद्ध चुकीचे आरोप करण्यात आले. या अपघातात त्या जखमी झाल्या होत्या. माझी प्रतिष्ठा जपण्यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून मी बंगळुरू सिटी सिव्हिल कोर्टात धाव घेतली. कोर्टाने माझ्याविरुद्ध चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसिद्ध करण्यास मनाई केली.
अभिनेत्री परुल यादवने म्हटले की, अधिक प्रसिद्धी मिळविण्यासाठी खऱ्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी महिलांना लक्ष्य करून त्यांची नावे ड्रग प्रकरणात गोवली जातात. फक्त महिलांचीच नावे बाहेर का येत आहेत. एकही पुरुष अभिनेता किंवा राजकीय नेत्यांच्या मुलांचा यात समावेश नसावा, हे पटण्यासारखे नाही.
अभिनेत्रींच्या खाजगी जीवनाबाबतच चौकशी का केली जाते, हेही मला उमजत नाही. अशा प्रकारे चौकशी होत असेल, तर व्यवस्थेवर विश्वास कसा ठेवावा? चित्रपट क्षेत्रातील काही जण दबावामुळे ड्रग्ज घेतही असतील; परंतु अशांची संख्या नगण्य आहे, असेही पारूल यादवने म्हटले आहे.