पत्नी अन् दीड वर्षाच्या मुलीचं शीर धडापासून वेगळे केले; समोरील दृश्य पाहून पोलीस हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 10:33 AM2022-08-07T10:33:31+5:302022-08-07T10:33:48+5:30
कौटुंबिक वादातून शुक्रवारी रात्री पतीने पत्नी मुरसुदा खातून आणि दीड वर्षाची मुलगी जिया परवीन यांची हत्या केली.
मधेपुरा - बिहारच्या मधेपुरा भागात एक ह्दयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका क्रूर पतीने माणुसकीला काळीमा फासला आहे. पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीचं शीर धडापासून वेगळे केले आहे. इतकेच नाही तर या घटनेनंतर आरोपीने पत्नीचं शीर सासरी जाऊन ठेवले तर मुलीचं शीर घरातील टेबलावर ठेवलं. आरोपी अन्य २ मुलांना घेऊन फरार झाला असून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.
मधेपुरा येथील रामनगर महेश पंचायतीतील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून शुक्रवारी रात्री पतीने पत्नी मुरसुदा खातून आणि दीड वर्षाची मुलगी जिया परवीन यांची हत्या केली. ही हत्या इतक्या क्रूरपणे करण्यात आली ज्यात दोन्ही मृतदेहाचं शीर धडापासून वेगळे केले होते. या निर्दयी बापाने स्वत:च्या पोटच्या मुलीचं शीर घरातील टेबलावर ठेवले आणि पत्नीचे कापलेले शीर घेऊन त्याच्या सासरी पोहचला. याठिकाणी पत्नीच्या माहेरच्या घरापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या एका पुलावर ते शीर ठेऊन तो फरार झाला. फरार होताना त्याने त्याच्यासोबत २ छोट्या मुलांना घेऊन गेला.
कापलेले शीर पाहून खळबळ
शनिवारी सकाळी जेव्हा गावातील लोक रस्त्याने पुलाच्या मार्गे जात होते तेव्हा एका महिलेचे शीर कापलेल्या अवस्थेत पाहून गावात खळबळ माजली. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. गर्दीत मृत महिलेच्या पित्याने मुलीचं कापलेले शीर पाहून जोरात हंबरडा फोडला. स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी मृत महिलेच्या शीरसोबत एक कागद मिळाला. तो पोलिसांनी जप्त केला.
आईला अटक, बाप फरार
या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू करत आरोपी पती जिब्राइलच्या घरी पोहचले त्याठिकाणी महिलेचे धड आढळले. तसेच एका कोपऱ्यात चिमुकलीच्या मुलीचं शीर आणि धड वेगवेगळे पडले होते. पोलिसांनी आरोपीची आई नजीदा खातूनला अटक केली तर वडील त्याठिकाणाहून फरार झाले. आरोपीने सासरकडील मंडळीच्या व्हॉट्सअपवर मर्डरचा व्हिडिओ आणि धमकीचे रेकॉर्डिंग पाठवले होते.