खूनप्रकरणी पत्नी, प्रियकराच्या मित्राला अटक; निलंगा पोलिसांनी पाच दिवसांत लावला छडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 12:58 AM2021-12-20T00:58:42+5:302021-12-20T00:58:50+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंगा तालुक्यातील शिवणी कोतल येथील शिवारात गावातीलच अविनाश नवनाथ गुरुणे, त्याचा मित्र धनाजी सूर्यभान वाघमारे यांनी मनीषा किशोर सुतार हिच्या सांगण्यावरून मनीषाचा पती किशोर विठ्ठल सुतार याचा १२ डिसेंबर रोजी मफलरने गळा आवळून खून केला.
लातूर- प्रियकर व त्याच्या मित्राच्या सोबतीने नवऱ्याचा खून केल्याप्रकरणी निलंगा पोलिसांनी महिला व प्रियकराच्या मित्रास रविवारी अटक केली असून, प्रियकर फरार आहे. प्रारंभी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांना संशय आल्याने तपासाची चक्रे गतिमान करून शनिवारी संशयित आरोपीचा शोध घेण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंगा तालुक्यातील शिवणी कोतल येथील शिवारात गावातीलच अविनाश नवनाथ गुरुणे, त्याचा मित्र धनाजी सूर्यभान वाघमारे यांनी मनीषा किशोर सुतार हिच्या सांगण्यावरून मनीषाचा पती किशोर विठ्ठल सुतार याचा १२ डिसेंबर रोजी मफलरने गळा आवळून खून केला.
गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या उसाच्या फडात ही घटना घडली. १३ डिसेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आल्यावर मयताचे भाऊ नंदकुमार विठ्ठल सुतार यांनी निलंगा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, निलंगा पोलिसांना घटनेत संशय आल्याने त्यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. पोलीस निरीक्षक बी. आर. शेजाळ यांनी तपास कामाला गती दिली. घटनेच्या पाच दिवसानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मयताची पत्नी मनीषा किशोर सुतार व धनाजी सूर्यभान वाघमारे या दोघांना अटक केली. तर मनीषाचा प्रियकर अविनाश गुरणे हा फरार असून, त्याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेजाळ यांनी दिली.