चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला जाळले; पतीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 07:42 PM2018-07-17T19:42:32+5:302018-07-17T19:43:55+5:30
चारित्र्यावर संशय घेऊन, दारूच्या नशेत पत्नी शिल्पाला रॉकेल ओतून पेटवून देणारा तिचा पती सचिन नीळकंठ मोरे (२५, रा. लक्ष्मी कॉलनी, छावणी) याला सत्र न्यायाधीश पी. एस. शिंदे यांनी खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
औरंगाबाद : चारित्र्यावर संशय घेऊन, दारूच्या नशेत पत्नी शिल्पाला रॉकेल ओतून पेटवून देणारा तिचा पती सचिन नीळकंठ मोरे (२५, रा. लक्ष्मी कॉलनी, छावणी) याला सत्र न्यायाधीश पी. एस. शिंदे यांनी खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
सचिन मोरे याचे शिल्पासोबत २७ मे २०११ रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर सचिनने शिल्पाला आठ-दहा दिवस चांगले वागवले. त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. यावरून शिल्पा आणि सचिन यांच्यामध्ये भांडण होत असे. २५ जून २०१२ रोजी सचिनने दारुच्या नशेत तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. या घटनेनंतर तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. पोलीस आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिल्पाचा जबाब नोंदविला. उपचारादरम्यान ३ सप्टेंबर २०१२ रोजी शिल्पा मरण पावली. तिच्या मृत्यूपूर्व जबाबावरून सचिन मोरे विरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सहायक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाट यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने सचिनला भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अॅड. सुदेश शिरसाट यांना अॅड. नितीन मोने आणि पैरवी अधिकारी बी. वाय. किरड पाटील यांनी सहकार्य केले.