करवा चौथचा चंद्र पाहिला मग पोलिसांना फोन करुन पतीला जेलमध्ये पाठवलं; सगळंच अचंबित घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 08:48 AM2021-10-25T08:48:14+5:302021-10-25T08:50:03+5:30
पत्नीने रात्री करवा चौथ सणाच्या दिवशी आरोपी पती राजीव गुलाटीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत ठेवलं होतं.
नवी दिल्ली – देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या नजफगड परिसरात एका घटनेने सगळ्यांना हैराण केले आहे. याठिकाणी एका महिलेने पोलिसांना फोन करुन स्वत:च्या पतीलाच अटक करायला लावलं आहे. महिलेच्या पतीने एका वृद्ध महिलेचा खून केला असून तो सध्या घरीच आहे. त्याला अटक करा परंतु मारु नका, मी त्याच्यासाठी करवा चौथचं व्रत ठेवलंय असं महिलेने फोनवरुन सांगितले.
खूनी पतीला पकडण्यासाठी पत्नीचा पोलिसांना फोन
दिल्लीच्या नजफगड परिसरात एका वृद्ध महिलेची गोळी मारुन हत्या आणि तिच्या मुलीला हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी राजीव गुलाटी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपीच्या पत्नीनेच पोलिसांना फोन करुन पती हत्या करुन घरीच असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी पोहचत आरोपीला बेड्या ठोकल्या.
मी पतीसाठी करवा चौथ व्रत केलय – आरोपीची पत्नी
पत्नीने रात्री करवा चौथ सणाच्या दिवशी आरोपी पती राजीव गुलाटीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत ठेवलं होतं. मात्र पतीने केलेल्या कृत्याला पाहून तिने पोलिसांना फोन करुन पतीला अटक करण्यास सांगितले. खूनी पती घरीच असून त्याला सरेंडर करायचं आहे. परंतु पतीला मारू नका, आज करवा चौथ आहे. मी पतीसाठी व्रत ठेवलंय असं आरोपीच्या पत्नीने पोलिसांना फोनवरुन सांगितले.
यावेळी द्वारका परिसरात गस्त घालणाऱ्या डीसीपी शंकर चौधरी, ज्वाइंट सीपी यांच्यासोबत आरोपीच्या घरी पोहचले त्यांनी आरोपीला कॉलरला पकडून बाहेर आणलं आणि अटक केली. नजफगड परिसरात कैलास नावाच्या महिलेला राजीव गुलाटीने गोळी मारली त्यात महिलेचा मृत्यू झाला. त्यावेळी राजीव गुलाटीने कैलासच्या मुलीलाही गोळी मारण्याचा प्रयत्न केला. सध्या या मुलीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ती जीवन मृत्यूशी संघर्ष करत आहे. दोन लाखाच्या आर्थिक देवाणघेवाणीवरुन कैलास आणि राजीव गुलाटी यांच्यात वाद झाला होता. याच कारणावरुन राजीवने कैलास या महिलेला गोळी मारुन ठार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.