रागावलेल्या बायकोला घरी परत आणण्यासाठी नवऱ्याने रचला भलताच प्लॅन; पोलीसही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 06:30 PM2024-04-10T18:30:46+5:302024-04-10T18:35:30+5:30
एका व्यक्तीची पत्नी रागावून माहेरी गेली. ती काहीही झालं तरी परत येण्यास तयार नव्हती. अशा परिस्थितीत पतीने असा काही प्लॅन केला जो समजल्यावर पत्नीसह पोलीस देखील हैराण झाले.
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका व्यक्तीची पत्नी रागावून माहेरी गेली. ती काहीही झालं तरी परत येण्यास तयार नव्हती. अशा परिस्थितीत पतीने असा काही प्लॅन केला जो समजल्यावर पत्नीसह पोलीस देखील हैराण झाले. सध्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवून कारवाई सुरू केली आहे. ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
पत्नीला परत आपल्या घरी यावी यासाठी पतीने दरोडा आणि अपहरणाची खोटी गोष्ट रचली. त्यासाठी तो गुजरातहून कानपूरला आला. खोटी गोष्ट खरी दिसण्यासाठी त्याने स्वत:ला जखमी केलं. मग स्वत:चे हातपाय बांधून झुडुपात पडून राहिला. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पत्नीला घरी बोलावण्यासाठी स्वत:च हे नाटक रचल्याची कबुली आरोपी पतीने दिली आहे. त्याच्यासोबत कोणतीही चुकीची घटना घडली नाही किंवा त्याचे अपहरणही झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये काम करणारा ललित कुशवाह गेल्या रविवारी कानपूरमधील भदेवन या आपल्या गावात आला होता.
ललित येथे आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली की, तो आपल्या घरी जात असताना एका कारमधील काही चोरट्यांनी त्याचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. त्याच्याकडे असलेले पैसे लुटल्यानंतर त्याचे हात-पाय बांधून त्याला झुडपात फेकून दिलं. कारण ललितने हीच गोष्ट घरच्यांना सांगितली होती, त्यामुळे घरच्यांचा त्याच्यावर विश्वास बसला.
कुटुंबीयांनी सांगितलं की, ललितचा शोध घेत असताना तो पोलीस स्टेशन हद्दीतील रायपूर गावाजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला. त्याची बॅग आणि रिकामं झालेलं पाकीट काही अंतरावर पडलं होतं. जखमी अवस्थेत असल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत त्याला कानपूरच्या हॅलेट हॉस्पिटलमध्ये पाठवले.
माहिती मिळताच ललितची पत्नीही रुग्णालयात पोहोचली. तिच्या नवऱ्याला खरंच काहीतरी झालंय असं तिला वाटलं. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही बारकाईने तपासले असता अपहरणाची घटना खोटी निघाली. कानपूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआरच्या आधारे ललितची चौकशी केली असता, त्याने पोलिसांना सांगितले की, घरगुती वादामुळे त्याची पत्नी तिच्या माहेरच्या घरी गेली होती. तिला परत घरी आणण्यासाठी त्याने हा प्लॅन तयार केला होता.