पत्नीचा गर्भपात करून काढले घराबाहेर, धानोरीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 02:00 AM2018-11-08T02:00:57+5:302018-11-08T02:01:03+5:30
चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा जबरदस्तीने गर्भपात करून तिला वाढदिवशीच घरातून हाकलून देणाऱ्या डॉक्टर पतीसह सात जणांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा जबरदस्तीने गर्भपात करून तिला वाढदिवशीच घरातून हाकलून देणाऱ्या डॉक्टर पतीसह सात जणांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
डॉ़ सुधीर मारुती बनसुडे, सासरा मारुती बनसुडे, सासू केशर बनसुडे, दीर राहुल बनसुडे, जाऊ स्वाती बनसुडे (सर्व रा़ ब्रम्हा स्काय सोसायटी, खेसे पार्कजवळ, धानोरी), तसेच नणंद वैशाली राऊत, पतीचा मामा हरिभाऊ भोसले अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत़
याप्रकरणी उज्ज्वला सुधीर बनसुडे (वय २६, रा़ वानवडी) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ हा प्रकार एप्रिल ते १६ सप्टेंबर २०१८ दरम्यान घडला आहे़
याबाबत पोलिसांनी सांगितले, की त्यांच्या लग्नात उज्ज्वला यांच्या घरच्यांनी सात तोळे सोने, भांडी दिली होती; पण हुंडा दिला नव्हता़ त्यामुळे लग्नानंतर त्यांचे पती डॉ़ सुधीर बनसुडे यांनी क्लिनिक टाकण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणण्यासाठी धमकावू लागले़ त्यांच्या वडिलांनी आपल्या भविष्यनिर्वाह निधीतून ५ लाख रुपये काढून ते जावयाला दिले़ त्यातून त्यांनी लोहगाव येथे नवीन क्लिनिक सुरू केले़ क्लिनिकसाठी त्यांचे दोन तोळे दागिनेही मोडले़ त्यांना दिवस गेल्यावर सुधीर याने बळजबरीने त्यांना कसले तरी औषधे देत़ त्यामुळे त्यांना शारीरिक त्रास होत होता़ दोन महिन्यांच्या गर्भवती असताना कसल्या तरी गोळ्या खाऊ घातल्या़ त्यातून रक्तस्राव झाल्यावर त्यांना धानोरी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करून ३० जुलैला त्यांचा गर्भपात घडवून आणला़ महिला साह्य कक्षातही त्याने तडजोड करण्यास नकार दिल्याने शेवटी उज्ज्वला यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक एस़ एस़ रासकर अधिक तपास करीत आहेत़
वाढदिवशी केली मारहाण
१४ सप्टेंबरला गौरीपूजन झाल्यावर त्यांच्या अंगावरील सर्व दागिने काढून घेतले़ १६ सप्टेंबरला उज्ज्वला यांचा वाढदिवस होता़ त्या दिवशी मध्यरात्री बारा वाजता सर्व जण वाढदिवस असणाºया व्यक्तीला शुभेच्छा देतात़ इथे उलट उज्ज्वला यांना सुधीरने मारहाण करून जबरदस्तीने कपड्याची बॅग भरायला लावली आणि घरातून हाकलून दिले़ त्यांनी वडिलांबरोबर जाऊन लोहगाव पोलिसांकडे तक्रार दिली़