पत्नीने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन केली पतीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 11:20 AM2021-08-05T11:20:40+5:302021-08-05T11:21:22+5:30
Crime News: मानकोली नाका येथे ओला कार चालकाची गळा आवळून हत्या केल्याची घटना १ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. या घटनेनंतर पत्नीच्या फिर्यादीवरून नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
भिवंडी : मानकोली नाका येथे ओला कार चालकाची गळा आवळून हत्या केल्याची घटना १ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. या घटनेनंतर पत्नीच्या फिर्यादीवरून नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलीस तपासात खुद्द पत्नीच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
प्रभाकर गंजी असे मृत कारचालकाचे नाव असून या गुन्ह्यात मयत प्रभाकर याची पत्नी श्रुती गंजी (३२) व तिचा प्रियकर नितेश गोवर्धन वाला (२८), मैत्रीण प्रिया निकम (३२) अशी आरोपींची नावे असून हत्या करणारे दोघे जण फरार आहेत. मयत प्रभाकर व पत्नी श्रुती या दोघांचेही अनैतिक वैवाहिक संबंध असून त्यातून पत्नी श्रुती हिने प्रियकर नितेशसोबत विवाह करण्यासाठी पतीकडे घटस्फोटासाठी तगादा लावला होता. मात्र पती प्रभाकर घटस्फोट देत नसल्याची माहिती तिने मैत्रीण प्रिया निकम हिला दिली. तिचासुद्धा घटस्फोट झाला असल्याने तिने श्रुती हिला पतीची हत्या करून काटा काढण्याचा सल्ला दिला. त्यासाठी आपल्या ओळखीचे दोन युवक असल्याचे सांगितले.
त्यानंतर पत्नी श्रुती हिने दागिने गहाण ठेवून एक लाख रुपयांची सुपारी हत्या करणाऱ्या दोघा जणांना दिली व त्यानंतर पत्नी श्रुती, प्रियकर नितेश, मैत्रीण प्रिया यांनी कट रचून हत्या करणाऱ्यांनी ३१ ऑगस्टच्या रात्री मुंबई येथे जाण्यासाठी प्रभाकर यास मोबाइल करून रात्री कार बुक केली व त्यानंतर प्रवासात माणकोली येथे मारेकऱ्यांनी गळा आवळून हत्या करून शव कारमध्येच ठेवून पसार झाले होते. श्रुती, तिचा प्रियकर नितेश व मैत्रीण या तिघांना बुधवारी अटक केली असून, या तिघांनाही न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्यांना १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.