पतीचा इन्स्टा रील्स बनवण्यास विरोध; संतापलेल्या पत्नीने माहेरच्या लोकांसह आवळला पतीचा गळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 03:59 PM2024-01-08T15:59:31+5:302024-01-08T16:10:00+5:30

रील्स बनवायला विरोध केल्याने संतापलेल्या पत्नीने आपल्या माहेरच्या लोकांच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Wife kills husband with familys help for opposing making Instagram reels | पतीचा इन्स्टा रील्स बनवण्यास विरोध; संतापलेल्या पत्नीने माहेरच्या लोकांसह आवळला पतीचा गळा

पतीचा इन्स्टा रील्स बनवण्यास विरोध; संतापलेल्या पत्नीने माहेरच्या लोकांसह आवळला पतीचा गळा

Husband Murder Case ( Marathi News ) : अलीकडच्या काळात इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स फॉरमॅट तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे. अनेक तरुण-तरुणी रील्स बनवत आपले कला-कौशल्य दाखवत असतात. मात्र यातून कधीकधी विचित्र घटनाही घडताना पाहायला मिळतात. अशीच एक घटना बिहारमधील बेगूसराय इथं घडली आहे. पतीने रील्स बनवायला विरोध केल्याने संतापलेल्या पत्नीने आपल्या माहेरच्या लोकांच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खोदाबंदपूर येथील फफौत गावात ही हत्येची घटना घडली आहे. समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला महेश्वर कुमार राय याचं सहा ते सात वर्षांपूर्वी फफौत येथील तरुणीशी लग्न झालं होतं. महेश्वर हा कामानिमित्त कोलकाता इथं राहत होता. मात्र सुट्टी असल्याने तो नुकताच घरी आला होता. घरी आल्यानंतर त्याने पत्नी राणी हिला इन्स्टाग्रामवर रील्स बनवू नको, असं सांगितलं. मात्र राणीला महेश्वरची ही मागणी मान्य नव्हती. काहीही झालं तरी मी रील्स बनवणारच, असं तिने निक्षूण सांगितलं. त्यानंतर पती-पत्नीत वाद होण्यास सुरुवात झाली.

रविवारी रात्री ९ वाजता महेश्वर हा फफौत या आपल्या सासुरवाडीत गेला होता. मात्र तिथं राणी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी महेश्वरची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. रात्री साडेदहा वाजता कोलकाता इथं काम करणाऱ्या महेश्वरच्या रुदल नावाच्या भावाने त्याला फोन केल्यानंतर महेश्वरचा फोन दुसऱ्याच कोणीतरी उचलला. त्यामुळे शंका आल्याने रुदल याने आपल्या वडिलांना महेश्वरची सासुरवाडी असलेल्या फफौत इथं जाण्यास सांगितलं आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महेश्वर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आणि त्याची पत्नी राणी हिला ताब्यात घेतलं. सध्या पोलिसांनी राणीची चौकशी सुरू असून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.
 

Web Title: Wife kills husband with familys help for opposing making Instagram reels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.