धक्कादायक! मॉर्निंग वॉकचा बहाणा करून पत्नीने केला पतीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 09:57 PM2020-09-30T21:57:33+5:302020-09-30T21:58:47+5:30
गुन्हे शाखा युनिट पाचने केला गुन्हा उघड
देहूरोड : देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मामुर्डीत मंगळवारी सकाळी एका युवकाचा डोक्यात व गळ्यावर फावड्याने वार करून खून करण्यात आला होता. यामध्ये मॉर्निंग वॉक व सायकलिंगला गेल्याचा बहाणा करून संबंधित युवकाच्या पत्नीने खून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखा युनिट पाचने हा गुन्हा उघड केला आहे.
मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मामुर्डी गावामध्ये मयूर गोविंद गायकवाड यांच्या डोक्यामध्ये व गळ्यावर फावड्याने वार करून ठार करण्यात आले होते. सदर घटनेबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ यांनी भेट दिली होती.
देहूरोड येथील गुन्हे शाखा, युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, मयूर वाडकर, संदीप ठाकरे, ज्ञानेश्वर गाडेकर, स्वामीनाथ जाधव यांच्या तपास पथकाने मयताची पत्नी ऋतू मयूर गायकवाड (वय २०, रा. भैरोबा मंदिरामागे, मामुर्डी, देहूरोड) हिला विश्वासामध्ये घेऊन सखोल तपास केला.
त्यावेळी तिने नवºयाकडून नेहमीच लैंगिक छळ होत होता. सदर त्रासाबाबत तिने अनेकदा सासू, सासरचे नातेवाईक तसेच आईवडील यांना सांगितले होते. तरीही काही मार्ग न निघाल्याने सदर त्रासातून सुटण्याकरिता पतीला संपवणे, हाच एक मार्ग तिला वाटत होता. त्यानुसार ४ दिवसांपासून प्लॅन करून तिने शेजारी राहणारी एक महिला व काही लहान मुलांसोबत मॉर्निंग वॉकला जाणे सुरू केले. ती नवरा एकटा घरी असण्याची वाट पाहू लागली. सोमवारी (दि. २८) तिच्या सासूला रात्रपाळी ड्यूटीकरिता जावे लागले व तिचा दीर हा घरी येणार नव्हता, याची माहिती तिला होती. पती मयूर याने रात्री उशिरा अकराच्या सुमारास दारू पिऊन जेवण केले. तो पूर्ण नशेमध्ये होता.
रात्रभर नवरा झोपला असताना त्याला संपविण्याबाबत अनेकदा विचार केला. शेवटी तिने सकाळी नेहमीप्रमाणे शेजारीण व लहान मुले यांच्याबरोबर मॉर्निंग वॉकला जाऊन आल्यावर मयूर हा झोपेत असताना त्याच्या डोक्यामध्ये फावडे घातले. पतीला मारताना तिच्या जिन्स पॅन्टवर उडालेले रक्त तिने पाण्याने साफ करून पुन्हा त्याच लहान मुलांसोबत सायकलिंग करण्याकरिता गेली. तसेच, परत आल्यावर आपण घरी नसताना अज्ञात व्यक्तींनी पतीची हत्या केल्याचा बनाव केला. सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, मयूर वाडकर, संदीप ठाकरे, धनराज किरनाळे, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गुट्टे, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, सावन राठोड, फारुक मुल्ला, नितीन बहिरट, भरत माने, राजकुमार इघारे, गणेश मालुसरे व राजेंद्र कदम यांनी केली आहे.