पोलीस पत्नीला खंडणीच्या गुन्ह्यात अटक, त्यानंतर सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 01:53 PM2020-01-02T13:53:13+5:302020-01-02T14:08:30+5:30
दर सोमवारी त्यांना पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास त्यांना सांगितल्याची माहिती विक्रोळी पोलिसांनी दिली.
मुंबई - गुटख्याची तस्करी करणाऱ्या टेम्पो चालकाकडून ५ लाखांच्या खंडणीची मागणी केल्याच्या आरोपावरून निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करत तिला रविवारी अटक करण्यात आली आहे. भारती चौधरी असे त्यांचे नाव असून, याच गुन्ह्यात त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक गुप्ता नामक टेम्पो चालक पान मसाला असलेले बॉक्स घेऊन भेंडी बाजारात जात होता. तर टेम्पो चालकाने दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांनी त्यांचा टेम्पो विक्रोळी, गोदरेज कंपनी येथे अडवला. पोलीस असल्याची बतावणी करत आरोपी महिलेसोबत असलेल्या युवकाने त्याला धमकावले. ५ लाखांची खंडणी मागितली. टेम्पो चालकाने पोलिसांना बोलावले. तेथे आलेल्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत चौधरी यांनी खंडणी मागितल्याचे स्पष्ट होताच त्यांना रविवारी अटक केली. त्यांना जामीन मिळाला असून, तपास सुरू आहे. दर सोमवारी त्यांना पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास त्यांना सांगितल्याची माहिती विक्रोळी पोलिसांनी दिली.