चला गाव फिरून येऊ! पत्नीचा हट्ट पुरवणं पडलं महागात; प्रवासादरम्यान पती झोपताच नवविवाहिता फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 08:54 PM2021-07-05T20:54:13+5:302021-07-05T20:56:23+5:30
सहा महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केलेली तरुण रेल्वेतून उतरून फरार; पोलिसांकडून शोध सुरू
बलिया: उत्तर प्रदेशाच्या बलिया जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेली एक तरुणी पळून गेली आहे. पती ट्रेन प्रवासादरम्यान झोपला असताना पत्नी ट्रेनमधून उतरली. तिनं एका रिक्षा चालकाकडून फोन घेतला आणि एका व्यक्तीला बोलावून त्याच्यासोबत पळून गेली.
बलिया रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर पती झोपेतून उठला. त्यावेळी त्याला पत्नी दिसली नाही. पत्नी सुरेमनपूर रेल्वे स्थानकात उतरल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानं सुरेमनपूर गाठलं. पत्नी एका तरुणासोबत पळून गेल्याची माहिती त्याला एका रिक्षा चालकानं दिली. पत्नीनं रिक्षा चालकाच्या फोनवरून पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. रिक्षा चालकाच्या मोबाईलवरून डायल करण्यात आलेला नंबर पत्नी ज्याच्यासोबत पळाली, त्या तरुणाचा होता. त्यानं एक-दोनदा फोन उचलला. मात्र त्यानंतर कॉल डायव्हर्ट होऊ लागला.
सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाल्यानंतर पत्नी पळून गेल्यानं पती चिंतेत सापडला. पत्नीच्या शोधासाठी तो परिसरात भटकला. अखेर त्यानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित पती बलिया जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याचं कुटुंब पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये वास्तव्यास आहे. त्याची पत्नी मूळची बिहारच्या गया जिल्ह्याची आहे. तिचं कुटुंबदेखील आसनसोलमध्ये वास्तव्यास आहे. दोघांनी डिसेंबरमध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केला. तेव्हापासून दोघे सोबत राहत होते. या लग्नामुळे तरुणीचे नातेवाईक नाराज होते.
बलियामधील गाव फिरण्यासाठी दोघे सियालदह एक्स्प्रेसनं निघाले होते. सुरेमनपूर येण्यापूर्वी पतीला झोप आली. बलिया स्थानक येताच त्याला जाग आली. मात्र पत्नी कुठेच दिसत नव्हती. त्यानं सहप्रवाशांकडे याबद्दल विचारणा केली असता पत्नी सुरेमनपूरला उतरल्याचं त्याला समजलं. यामुळे त्रस्त झालेल्या पतीनं लगेच सुरेमनपूर गाठलं. आता पोलीस बेपत्ती पत्नीचा शोध घेत आहेत.