लॉकडाऊनमुळे पत्नी अडकली माहेरीच! घरात घेण्यास पतीचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 02:20 AM2020-08-25T02:20:31+5:302020-08-25T02:20:53+5:30
महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल
मुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊनदरम्यान घाटकोपरमध्ये माहेरी अडकलेल्या पत्नीला कांदिवलीत राहणाऱ्या पतीने कोरोनाचे कारण पुढे करत घरात घेण्यास, तसेच दोन मुलींना भेटण्यास मज्जाव केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तिने राष्ट्रीय महिला आयोगात धाव घेतल्यानंतर समतानगर पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे.
पीडित महिलेचे लग्न १ जून, २००३ रोजी नामांकित एअरवेज कंपनीत काम करणाºया व्यक्तीसोबत झाले. सध्या ती कांदिवली पूर्वच्या ठाकूर व्हिलेजमध्ये पती व तेरा आणि पंधरा वर्षांच्या मुलीसह राहत होती. ती घाटकोपरमध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सांभाळते जे पूर्वी कांदिवलीत होते. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, या कार्यालयाची १२ मार्च, २०२० रोजी डागडुजी सुरू करण्यात आली होती. १९ मार्च, २०२० रोजी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने २२ मार्च, २०२० पर्यंत घाटकोपर बंद केले.
कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम अर्धवट राहिल्याने महिलेने कांजूरमार्ग या ठिकाणी असलेल्या तिच्या माहेरी राहण्यास सुरुवात केली. तिच्या पतीने फेब्रुवारी, २०२० मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यामुळे महिला त्याच्याशी संभाषण करीत नव्हती. मात्र नंतर तिने प्रयत्न करूनही तिच्या मुलींशी तिचा संपर्क झाला नाही. दरम्यान, लॉकडाऊनही दोन महिने वाढला. त्यामुळे अखेर मे, २०२० रोजी ती घरी परतली ज्यावर तिचाही मालकी हक्क आहे. मात्र तिच्या पतीने सोसायटीला सांगून तिला १४ दिवस क्वॉरंटाइन होण्यास सांगितले. तसेच तिला कोरोना चाचणी करून येण्यास सांगितली. क्वॉरंटाइन राहिल्यावरही त्याने तिला घरात घेण्यास नकार दिला. पोटच्या पोरींना भेटू दिले नाही.
कोर्टातून ऑर्डर आण असेही पत्नीला सांगितले. याची माहिती तिने वेळोवेळी समतानगर पोलिसांना दिली आणि त्यांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतल्याचे तिने जबाबात म्हटले आहे. २५ जून, २०२० रोजी मात्र तिने तिच्याजवळील बनावट चावीने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यावेळीही तिला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्याने केला. तसेच घरात जेवण लपवून ठेवणे, लायटर लपविणे, झोपल्यावर पंखा बंद करणे असे प्रकार सुरू केले. याला कंटाळून अखेर ती बाहेर पडली आणि तिने वकिलांच्या मदतीने राष्ट्रीय महिला आयोगात धाव घेत नंतर समतानगर पोलिसात दखलपात्र गुन्हा दाखल करवला. वंशाच्या दिव्यासाठी छळ! पीडित महिलेला दोन मुली आहेत. मात्र तिचा पती व त्याच्या घरच्यांना ‘वंशाचा दिवा’ म्हणून मुलगा हवा होता. दुसºया मुलीच्या जन्मापासून तिला सासरच्याकडून मानसिक त्रास देण्यास सुरुवात झाली होती, असेही तिच्या जबाबात नमूद आहे.
आणि तक्रार दाखल झाली
पीडित महिलेला होणाºया त्रासाबाबत आम्ही राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली. त्यानुसार त्यांनी पोलीस आयुक्तांना याबाबत सूचना दिल्या आणि अखेर समतानगर पोलिसांनी याप्रकरणी दखलपात्र गुन्ह्याची नोंद करून घेतली.
- अॅड्. विशाल सत्यप्रकाश सक्सेना, पीडितेचे वकील