Crime News: मित्रांनी घात केला! पत्नी केक कापण्यासाठी वाट पाहत होती, लग्नाच्या वाढदिनीच नगरसेवकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 08:14 PM2022-11-24T20:14:36+5:302022-11-24T20:14:56+5:30
पोलिसांनी पाच आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. तसेच आतापर्यंत दोघांनाच अटक करण्यात आली आहे. या हत्येचा १३ सेकंदांचा लाईव्ह व्हिडीओ देखील समोर आला आहे.
ग्वाल्हेर : ग्वाल्हेरमध्ये बुधवारी रात्री धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाचे नगरसेवक शैलेन्द्र कुशवाह यांचा लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून खून करण्यात आला. हा खून त्यांच्याच मित्रांनी केला असून लग्नाच्या वाढदिनीच हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
कुशवाह हे मुरार कँटोमेंट वॉर्डमधून नगरसेवक होते. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. कुशवाह यांच्या कुटुंबीयांनी आरोपींची घरे तोडण्याची मागणी करत पोलीस ठाण्याला घेराव घातला, तसेच रस्ताही अडविला होता.
कुशवाह यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. बुधवारी रात्री ते घरी आले होते, पत्नीकडे केक आणि मुलांसाठी जेवण देऊन मित्रांसोबत बाहेर गेले होते. यावेळी त्यांचा खून करण्यात आला. पोलिसांनी पाच आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. तसेच आतापर्यंत दोघांनाच अटक करण्यात आली आहे. या हत्येचा १३ सेकंदांचा लाईव्ह व्हिडीओ देखील समोर आला आहे.
कुशवाह हे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक होते. राज्यमंत्री भारत सिंह कुशवाह यांचा समर्थक होता. शैलेन्द्र यांची पत्नी राधा यांनी सांगितले की, बुधवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. मुलांना खायला आणून देऊन ते येतो असे सांगून गेले. परंतू परतलेच नाहीत. काही लोकांनी त्यांना काठ्यांनी मारहाण केली, रात्री अडीज वाजता त्यांचा मृत्यू झाला.
कुशवाह यांचा विक्की नावाचा मित्र होता. त्याचाही बुधवारीच वाढदिवस होता. त्याने पार्टी ठेवली होती. तो कुशवाह यांना सोबत घेऊन गेला होता. रात्री त्यांच्यावर जिवघेणा हल्ला झाल्याचे समजले. राजेश शर्मा हा सकाळपासून कुशवाह यांच्यासोबत होता, असे तिने सांगितले. शैलेंद्र यांचा भूरा तोमर याच्याशी तीन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. ते बोलत नव्हते. दोन दिवसांपूर्वीच शैलेंद्र यांनी त्याच्याशी बोलण्यास सुरुवात केली होती. मी केक कापण्यासाठी वाट पाहत होती. तसे ते १२ नंतरच घरी येतात. परंतू १२.३० वाजता त्यांना त्यांचे मित्र मारत असल्याचा फोन आला आणि सारे संपले, असे राधा यांनी सांगितले.