विकासकाच्या हत्येमागे पत्नीचाच हात?; संपत्तीसाठी पतीची हत्या केल्याचा पोलिसांकडून उलगडा

By सूर्यकांत वाघमारे | Published: January 15, 2024 07:54 PM2024-01-15T19:54:25+5:302024-01-15T19:54:43+5:30

कामगारासह पत्नीला अटक, या हत्येमागे सिंग यांचाच कामगार व पत्नी असल्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे

Wife's hand behind developer's murder?; Police revealed that she killed her husband for wealth | विकासकाच्या हत्येमागे पत्नीचाच हात?; संपत्तीसाठी पतीची हत्या केल्याचा पोलिसांकडून उलगडा

विकासकाच्या हत्येमागे पत्नीचाच हात?; संपत्तीसाठी पतीची हत्या केल्याचा पोलिसांकडून उलगडा

नवी मुंबई : सीवूड येथे झालेल्या विकासकाच्या हत्येप्रकरणी एनआरआय पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये मारेकरूसह मृत विकासकाच्या पत्नीचा समावेश आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध असून विकासकाचा विविध गुन्ह्यात सहभाग असल्याने संपत्ती जप्त होण्याच्या भीतीने त्यांनी हत्या केल्याचा उलगडा झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

सीवूड सेक्टर ४४ येथील अमन डेव्हलपर्सचे मनोजकुमार सिंग (३९) यांची शनिवारी हत्या झाली होती. कार्यालयात त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला होता. मनोजकुमार सिंग यांच्यावरही फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हत्येमागे आर्थिक वादाचे कारण आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला होता.   

मात्र या हत्येमागे सिंग यांचाच कामगार व पत्नी असल्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली आहे. सिंगच्या कार्यालयात काम करणारा राजू उर्फ शमसुल अबुहुरेरा खान (२२) याच्यासोबत पत्नी पूनम सिंगचे प्रेमसंबंध होते असे उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हत्येच्या घटनेनंतर तपासासाठी एनआरआय पोलिसांची पथके तयार करण्यात आली होती. त्यामध्ये राजू याच्यावर संशय आल्याने चौकशीत हत्येत त्याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेतले असता गुन्ह्याची कुबली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मनोजकुमार यांच्यावर गुन्हे असल्याने या गुन्ह्यात त्यांची संपत्ती जप्त होईल अशी भीती पत्नी पूनमला होती. त्यामुळे राजुच्या मदतीने हत्येचा कट रचून कार्यालयात ते एकटेच असताना डोक्यात रॉडने मारहाण करून हत्या केली असेही पानसरे यांनी सांगितले.

दरम्यान मनोजकुमार यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर रात्री कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी के. कुमार नावाची व्यक्ती भेटायला येणार होती असे पत्नी पूनम यांनी पोलिसांना कळवले होते. परंतु त्यांचा यामध्ये अद्याप सहभाग उघड झालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु हत्येच्या घटनेनंतर मनोजकुमार यांच्या कार्यालयातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर पोलिसांना मिळून आलेला नाही. तो मिळाल्यानंतर हत्येचे चित्र स्पष्ट होणार असून तो मिळेल याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. 

Web Title: Wife's hand behind developer's murder?; Police revealed that she killed her husband for wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.