साताऱ्यात रानडुकराची शिकार; बंदूक लागली वनविभागाच्या हाती

By प्रगती पाटील | Published: December 17, 2023 10:19 PM2023-12-17T22:19:04+5:302023-12-17T22:19:32+5:30

शहराजवळील महादरे संरक्षण राखीव जंगलात घडला धक्कादायक प्रकार

Wild boar hunting in Satara; The gun fell into the hands of the forest department | साताऱ्यात रानडुकराची शिकार; बंदूक लागली वनविभागाच्या हाती

साताऱ्यात रानडुकराची शिकार; बंदूक लागली वनविभागाच्या हाती

प्रगती जाधव पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: शहराजवळ महादरे संरक्षण राखीव या जंगलात रविवारी रानडुकराच्या शिकारीचा प्रकार उघडकीस आला. शिकारीत वापरलेली बंदूक वनविभागाच्या हाती लागली आहे. तथापि शिकारी पळून जाण्यात यशस्वी ठरले.

निसर्ग संपन्न सातारा शहराला शहराच्या हद्दीवर महादरीचे जंगलात हा धक्कादायक प्रकार उघडकिस आला. महादरेच्या जंगलाला संरक्षण राखीवचा दर्जा मिळाला आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याच जंगलात रविवारी काही पोलीस कर्मचारी सरावाचा भाग म्हणून महादरेच्या पायऱ्या चढून यवतेश्वर नजीकच्या पठारावर निघाले होते. त्यावेळी गंभीर जखमी अवस्थेतील एक रानडुक्कर पोलिसांना धावताना दिसले. त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. वनाधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत रानडुकराने प्राण सोडला होता. त्याच्या डोळ्यात बंदुकीची गोळी लागली होती.

 घटनास्थळी वन अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत एका झुडपामध्ये शिकारीसाठी वापरलेली बंदूक आढळून आली. याच बंदुकीने शिकाऱ्यांनी नेम साधला असावा. पोलीस व वनविभागाची धावपळ पाहून शिकारी बंदूक लपून पळाले असावेत, असा कयास आहे. याप्रकरणी वनाधिकाऱ्यांनी पोलीस व महसूल प्रशासनाशी संपर्क साधला असून बंदुकीवरून त्याच्या मालकाचा शोध सुरू असल्याचे समजते.

रानडुक्कर हे शेड्युल तीन मध्ये गणला गेलेला वन्यजीव आहे त्याची शिकार केल्याचे सिद्ध झाल्यास तीन वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते, अशी कायद्यात तरतूद आहे.

Web Title: Wild boar hunting in Satara; The gun fell into the hands of the forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.