चार सायाळची शिकार: एकाला अटक, तिघे पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 07:30 PM2019-07-13T19:30:12+5:302019-07-13T19:30:31+5:30

सायाळची शिकार करून घरात लपवून ठेवणाऱ्या  तिवसा तालुक्यातील एका आरोपीला वनविभागाने अटक केली. तीन आरोपी पसार झाले आहेत.

Wildlife hunt : one arrested | चार सायाळची शिकार: एकाला अटक, तिघे पसार

चार सायाळची शिकार: एकाला अटक, तिघे पसार

Next

अमरावती - सायाळची शिकार करून घरात लपवून ठेवणाऱ्या  तिवसा तालुक्यातील एका आरोपीला वनविभागाने अटक केली. तीन आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच्या घरातून मृतावस्थेतील चार सायाळ जप्त केल्या. त्यांची शिकार चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील माळेगाव वनवर्तुळात करण्यात आली होती. 

विलास किसन राठोड (रा. भिवापूर, ता. तिवसा) असे अटक आरोपीचे, तर मंगल जाधव, दिनेश चव्हाण, गोकुल चव्हाण (तिन्ही रा. भिवापूर) अशी पसार आरोपींची नावे आहेत. विलासने सायाळची शिकार करून घरात लपवून ठेवल्याची माहिती वनविभागाला गुरुवारी मिळाली होती.  त्या आधारे उपवनसरंक्षक गजेंद्र नरवणे, सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे,  चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनातील पथकाने विलास राठोडच्या घरावर धाड टाकली. त्याच्या घरातून चार मृत सायाळ जप्त केल्या. चारही सायाळ भाजलेल्या अवस्थेत होत्या. शिकारी त्या सायाळ फस्त करण्याच्या बेतात होते. 

वनविभागाने आरोपी विलास राठोड याला तात्काळ अटक केली. त्याच्या चौकशीत आणखी तीन आरोपी  पुढे आले असून, पसार मंगल, दिनेश व गोकुल यांचा शोध वनविभाग घेत आहे. वनविभागाने आरोपीविरुद्ध वन्यजीव (सरंक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, ४९, ४८ (अ), ५१ नुसार गुन्हा नोंदविला. आरोपी विलासला शुक्रवारी तिवसा न्यायालयातील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने तीन दिवसाची वनकोठडी ठोठावली आहे. 

सायाळ शेड्यूल ४ चा वन्यप्राणी
सायाळ शेड्यूल ४ चा वन्यप्राणी आहे. कीटक हे त्याचे भक्ष्य आहे. जमीन भुसभुशीत करून त्यात राहत असल्याने पाणी जिरण्यास या प्राण्याकरवी मोठी मदत मिळते. या वन्यप्राण्याच्या शिकारीबद्दल तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद वनकायद्यात आहे. 

या पथकाने केली कारवाई 
सायाळ शिकाऱ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने विशेष पथकाची नियुक्ती केली होती. त्यामध्ये वर्तुळ अधिकारी संतोष धापड, वनपरिक्षेत्र अधिकारी  पी.एन. तिडके, वनरक्षक प्रीती तिवारी, कल्याणी रेखे, एस.डब्ल्यू. थोटे, धनराज गवई यांच्यासह अमरावती येथून कार्स संस्थेचे वन्यजीवप्रेमी चेतन भारती आणि विज्जू खोट्टे यांना पंच म्हणून यांचा सहभाग होता. तसेच जसवंत, डोंगरे, विधळे, कथलकर, हिवराळे, चव्हाण, भुगुल यांनी पथकाला सहकार्य केले.

Web Title: Wildlife hunt : one arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.