पिंपरी शहरातील वाहनचोरीमागील ‘मास्टर माइंड’ पोलिसांच्या जाळ्यात अडकणार का..?
By महेश गलांडे | Published: July 17, 2020 03:28 PM2020-07-17T15:28:04+5:302020-07-17T15:29:33+5:30
शहरात रोज तीन ते चार घटना वाहन चोरीच्या घटना घडत आहे।
पिंपरी : शहरात दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिवसाला किमान दोन दुचाकीचोरीला जाण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. शुक्रवारीदेखील तीन दुचाकीची चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदली गेली आहे. शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला तातडीने अटक करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. या समस्येमुळे त्यांच्या डोकेदुखीत भर पडली आहे.
पार्किंग केलेली व लॉक असलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना दापोडी येथे घडली. याप्रकरणी संजय रावसाहेब पाटील (वय ४५, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची काळ्या रंगाची स्प्लेंडर दापोडी येथील सीएमई गेटसमोर पार्किंग केली असताना चोरीला गेली. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी लॉक केली असताना ते तोडून चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दुसरी घटनादेखील भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. १३ जुलै रोजी भोसरी गावातील राजमाता उड्डाणपुलाखालून फिर्यादी चालक्येल पोतन थॉमस यांची झेन कार चोरीला गेली. कार पार्किंगमध्ये लॉक केली होती. या वेळी अज्ञात चोरट्याने ती पळवली. तिसरी घटना चाकण पोलीस स्टेशन हद्दीत घडली. आळंदी फाटा येथून ११ जुलै रोजी सकाळी साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास फिर्यादी किरण तुकाराम घुगे (वय २८, रा. मोशी) यांची प्लॅटिना चोरीला गेल्याची घटना घडली. फिर्यादी यांनी आळंदी फाट्याच्या कॉर्नरजवळ दुचाकी लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने लॉक तोडून चोरल्याचे समोर आले आहे.
या कृत्यामागील मास्टर माइंडपर्यंत पोलीस पोहचणार का?
उद्योगनगरीतील वाहन चोरट्यांच्या ‘उद्योगामुळे’ दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत. शहरात दररोज तीन ते चार दुचाकी व चारचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. यामागे कुणा मोठ्या गुन्हेगाराचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, अद्याप त्याचा शोध त्यांना लागलेला नाही. या सर्व घटनांमागील मास्टर माइंड कोण? हे शोधणे येत्या काळात पोलिसांपुढील मोठे आव्हान आहे. अशा ‘अज्ञात’ चोरट्यांना बेड्या ठोकल्यास वाहनचालकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे.