माझ्याशी लग्न करणार का?...; मुलीचा नकार ऐकताच युवकानं उचललं भयानक पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 10:30 AM2022-09-27T10:30:56+5:302022-09-27T10:31:10+5:30
युवक हा वाहनचालक आहे. तो शेजारील राहणाऱ्या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. या मुलीसमोर अनेकदा त्याने प्रेमाची कबुली दिली.
मथुरा - उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एकतर्फी प्रेमातून सनकी प्रियकरानं मुलीसमोर स्वत:वर धारदार शस्त्रानं वार केले त्यानंतर मुलीवरही हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. या घटनेतील युवक-युवतीला जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तिथे युवकाची परिस्थिती नाजूक आहे. तर जखमी युवतीवर उपचार करून तिला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युवक हा वाहनचालक आहे. तो शेजारील राहणाऱ्या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. या मुलीसमोर अनेकदा त्याने प्रेमाची कबुली दिली. परंतु मुलीने त्याकडे दुर्लक्ष केले. सोमवारी सकाळी युवकाने त्या मुलीला पाहिल्यानंतर सर्वांसमोर तिला लग्नाची मागणी घातली. मात्र मुलीने नकार दिला. त्यामुळे युवकाचा संताप अनावर झाला. त्याने मुलीसमोर धारदार शस्त्राने स्वत:वर वार केले. तो इथेच थांबला नाही तर त्याने मुलीवरही जीवघेणा हल्ला केला. या घटनेत दोघेही जखमी झाले.
मुलीचा आक्रोश ऐकून लोक जमले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना देत जखमींना पोलिसांच्या मदतीने हॉस्पिटलला दाखल केले. याठिकाणी युवकाची प्रकृती नाजूक आहे असं डॉक्टरांनी म्हटलं तर युवतीला प्राथमिक उपचार देत घरी सोडण्यात आले आहे. याबाबत युवकाची आई म्हणाली की, माझा मुलगा सकाळी उठल्यानंतर सीएनजी गॅस भरण्यासाठी जात होता. त्यावेळी शेजारच्यांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर हल्ला केला. हा हल्ला का केला याबाबत मला काही माहिती नाही असं त्यांनी सांगितले.
दुसरीकडे मुलीने म्हटलं की, युवकाने गाडी थांबवून मला प्रपोज केले, लग्नाची मागणी घातली. त्याला मी नकार दिल्यानंतर त्याने स्वत:ला जखमी करण्यास आणि मला मारण्याची धमकी दिली. मी धमकीकडे दुर्लक्ष केले आणि तिथून जायला लागली तेव्हा त्याने स्वत:च्या गळ्यावर हल्ला केला आणि माझ्यावरही वार केले. त्यात माझ्या हाताला जखम झाली असं सांगितले. पोलिसांना स्थानिकांनी फोन करून युवक-युवती जखमी असल्याचे सांगितले. सध्या युवकाने स्वत:वर हल्ला केला की त्याच्यावर कुणी हल्ला केला याबाबत पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी कुणीही तक्रार नोंदवली नाही.