पर्दाफाश! रेल्वे पोलिसांच्या मदतीनं साडे चार किलो सोन्यावर मारला होता डल्ला, नोकरासह दोन पोलिसांना अटक
By मनीषा म्हात्रे | Published: December 12, 2022 06:42 PM2022-12-12T18:42:43+5:302022-12-12T18:43:31+5:30
ट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मँगलोर येथील सोन्याचे व्यापारी असून त्यांनी पाटीलकडे विश्वासाने झवेरी बाजार येथे पोहविण्यासाठी ४.५ किलोग्रॅम सोने दिले होते. पण...
मुंबई : रेल्वे पोलिसांच्या मदतीने नोकरानेच मालकाच्या अडीच कोटी रुपयांच्या साडे चार किलो सोन्यावर हात साफ केल्याचे ट्रॉम्बे पोलिसांच्या चौकशीतून उघडकीस आले आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी नोकर नितीन भुजिंग पाटील (२८) याच्यासह ठाणे रेल्वे पोलीस प्रभाकर युवराज नाटेकर (२९) आणि विकास भिमा पवार (२८) या त्रिकूटाला अटक केली आहे.
ट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मँगलोर येथील सोन्याचे व्यापारी असून त्यांनी पाटीलकडे विश्वासाने झवेरी बाजार येथे पोहविण्यासाठी ४.५ किलोग्रॅम सोने दिले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे पाटील झवेरी बाजारात न पोहचल्याने त्यांना संशय आला. त्यांनी मुंबईत धाव घेतली. यानंतर, पाटीलने अन्य क्रमांकावरून संपर्क साधत त्याच्याकडील सोन्याची चोरी झाल्याचे सांगितले. त्यावरून तक्रारदार यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाणे गाठून तक्रार दीली.
परिमंडळ ६ चे पोलीस उप आयुक्त हेमराजसिंह राजपूत, ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र रणशेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास सुरू झाला. अखेर, नोकराच्या जबाबात तफावत आढळून आल्याने त्यांनी त्याच्याकडेच उलटतपासणी सुरू केली. अखेर, त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत पोलीस मित्राच्या मदतीने त्यानेच हा कट आखल्याचे समोर आले.
असा रचला डाव -
नितिन पाटील हा गेल्या सहा वर्षांपासून तक्रारदार व्यापाऱ्याकडे कामाला आहे. तसेच मालकाकडे खूप पैसे असून साडे चार किलो सोन्याने काही फरक पडणार नाही असे समजून त्याने चोरीचा डाव आखला. यामध्ये ठाणे रेल्वे पोलीस दलात असलेल्या मित्रांची मदत घेतली. त्यांचीही कोट्यवधीचे सोने पाहून नियत फिरली. त्यानंतर, सोने नाटेकरकडे देत तो जुईनगर स्थानकातील पोलिसांकडे गेला. आणि चोरी झाल्याचे सांगून तेथून मालकाला कॉल करून सांगितले. मात्र, मालक मुंबई पोलिसांकडे गेला आणि अवघ्या काही तासातच आरोपीचे बिंग फुटले.
पोलिसाच्या गावच्या घरातून दागिने हस्तगत
नाटेकरने त्याच्या गावच्या घरात दागिने लपवून ठेवले होते. पोलिसांनी सर्व दागिने हस्तगत केले आहे. दागिने मिळाल्यामुळे व्यापाऱ्याने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.