माता न तू वैरिणी! प्रियकरासाठी आईनेच काढला चिमुकल्या लेकाचा काटा, 'असा' झाला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 06:23 PM2024-04-15T18:23:31+5:302024-04-15T18:34:07+5:30
लहान मुलाची त्याच्याच आईने तिच्या प्रियकरासह मिळून हत्या केली होती. त्यानंतर मृतदेह नाल्यात फेकून दिला.
राजस्थानच्या अलवरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 एप्रिल रोजी एका लहान मुलाचा मृतदेह नाल्यात सापडल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या लहान मुलाची त्याच्याच आईने तिच्या प्रियकरासह मिळून हत्या केली होती. त्यानंतर मृतदेह नाल्यात फेकून दिला. हा मुलगा अपंग होता. त्यामुळे त्याच्या उपचारासाठी बराच पैसा खर्च करावा लागला.
मुलाच्या उपचाराच्या खर्चाला कंटाळून आईने प्रियकरासह त्याची हत्या केली. आईचं आणि तिच्या प्रियकराचं प्रेम हे फक्त दीड महिन्याचं होतं. भिवडीचे एएसपी अतुल साहू यांनी सांगितलं की, 10 एप्रिल रोजी फ्लोरिडा इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीजवळील एका नाल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला.
जवळपास लावण्यात आलेल्या सुमारे 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासण्यात आलं. यामध्ये एक महिला आणि एक पुरुष संशयित म्हणून दिसले. पोलिसांनी फुटेजच्या आधारे त्यांचा शोध घेतला. त्यानंतर फुटेजच्या आधारे प्रत्येक घरात चौकशी करून मुलाची माहिती गोळा करण्यात आली.
फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयित पुरुष आणि महिलेची पोलिसांनी ओळख पटवली. नंतर त्यांना पकडून त्यांची स्वतंत्रपणे चौकशी केली असता दोघांनी मुलाची हत्या केल्याचं मान्य केलं. या प्रकरणी पोलिसांनी आई मुन्नी देवी आणि तिचा प्रियकर अरविंद कुमार यादव यांना अटक केली आहे.
पोलिसांच्या चौकशीत मुन्नी देवीने सांगितले की, ती सुमारे चार वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत आहे. तिचा नवरा दिल्लीत राहतो. मुलगा विक्रमसोबत ती भिवडी येथे राहते. सुमारे दीड महिन्यांपूर्वी तिची भिवडीतील याच वसाहतीत राहणाऱ्या अरविंद कुमार याच्याशी ओळख झाली आणि दोघेही एकत्र राहू लागले.
मुलगा विक्रम हा अपंग होता. त्याचा पाय दुखत होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यासाठी खूप पैसा खर्च केला जात होता. त्याच्या आजारपणाला कंटाळून दोघांनी त्याची हत्या करण्याचा कट रचला. त्यानंतर मृतदेह जवळच्याच नाल्यात फेकून दिला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.