अनैतिक संबंधाच्या रागातून दोघांची हत्या; विधवा सुनेसह प्रियकराला ट्रॅक्टरनं चिरडलं

By कुणाल गवाणकर | Published: October 30, 2020 01:30 PM2020-10-30T13:30:47+5:302020-10-30T13:32:13+5:30

सासरे आणि दिराला पोलिसांकडून अटक; हत्येचा गुन्हा दाखल

Woman and her Partner Crushed Under Tractor by In Laws in jalana | अनैतिक संबंधाच्या रागातून दोघांची हत्या; विधवा सुनेसह प्रियकराला ट्रॅक्टरनं चिरडलं

अनैतिक संबंधाच्या रागातून दोघांची हत्या; विधवा सुनेसह प्रियकराला ट्रॅक्टरनं चिरडलं

Next

जालना: अनैतिक संबंधातून एका महिलेसह तिच्या प्रियकराची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना जालन्यातील चपळगावात घडली आहे. या प्रकरणी महिलेचे सासरे आणि दिराला अटक करण्यात आली आहे. विधवा सुनेचे प्रेमसंबंध असल्याच्या रागातून हा प्रकार घडला. ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. मारिया लालझरे आणि हरबक भागवत अशी मृतांची नावं आहेत.

दोघांची हत्या करणाऱ्या बथवेल लालझरे आणि विकास लालझरे यांना चपळगाव पोलिसांनी अटक केली आहे. बथवेल लालझरे हे मारियाचे सासरे असून विकास हा तिचा दिर आहे. मारियाच्या (वय ३२ वर्षे) पतीचं १० वर्षांपूर्वी निधन झालं. त्यानंतर ती तिच्या सासू सासऱ्यांसोबत राहत असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी दिली. मारियाचे गावातल्याच हरबक भागवतसोबत (वय २७ वर्षे) प्रेमसंबंध होते. भागवत विवाहित होता.

मारिया आणि हरबकच्या प्रेम संबंधाला तिच्या सासरच्या मंडळींचा विरोध होता. मारियापासून दूर राहा, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी त्यांनी हरबकला दिली होती. त्यानंतर हरबकनं अंबड पोलीस ठाण्यात मारियाचे सासरे आणि दिराविरोधात तक्रार दाखल केली. आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यानं तक्रारीत म्हटलं होतं. ३० मार्चला हरबक आणि मारिया गुजरातला पळून गेले. त्यानंतर मारियाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. 

२२ एप्रिलला पोलिसांनी दोघांना गुजरातमधून परत आणलं. त्यानंतर ते गावात एकत्र राहू लागले. २८ ऑक्टोबरला मारिया आणि हरबक दुचाकीवरून शेजारच्या गावाला जात होते. त्यावेळी ट्रॅक्टरने येत असलेल्या विकास लालझरेने त्यांना धडक दिल्याचा आरोप आहे. विकासने त्यांना ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. रुग्णालयात नेत असतानाच दोघांचा मृत्यू झाला.

विकास लालझरे आणि त्याच्या वडिलांनीच माझ्या पतीचा आणि मारियाचा खून केल्याचा आरोप हरबकच्या पत्नीनं केला. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली असून पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
 

Web Title: Woman and her Partner Crushed Under Tractor by In Laws in jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.