हनी ट्रॅपद्वारे महिलेनं डॉक्टरला अडकवले, व्हिडिओ दाखवत 2 लाख उकळले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 08:25 AM2021-11-23T08:25:12+5:302021-11-23T08:25:58+5:30
१९ नोव्हेंबर रोजी अमित माने, दीपक माने आणि मनोज नायडू या तिघांसोबत एक महिला त्यांच्या क्लिनिकमध्ये घुसली आणि डॉक्टरांना मारहाण करत या टोळीने त्यांच्याकडून दोन लाख रुपये उकळून पसार झाले.
मुंबई : ‘‘हनी ट्रॅप’’ लावत चारकोपमध्ये एका ५३ वर्षीय डॉक्टरला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न फसल्यावर त्यांच्या क्लिनिकमध्ये शिरत दोन लाख उकळण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी दोन महिला आणि तीन पुरुषांना अटक केली आहे. डॉक्टरला मारहाण केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.
चारकोप येथील सेक्टर ३ मधील डॉक्टर सुधीर शेट्टी यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा छळ करण्यात आला. मारहाण करण्यात आली आणि दोन लाख रुपये उकळण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपी महिलेने ८ नोव्हेंबर रोजी डॉक्टरकडे गेल्यावर तिला तपासत असताना व्हिडिओ शूट केले. त्यानंतर महिलेने व्हिडिओ दाखवत डॉ. शेट्टी यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच अडीच लाख रुपये न दिल्यास व्हिडिओ पोस्ट करण्याची धमकीदेखील देण्यात आली.
दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी अमित माने, दीपक माने आणि मनोज नायडू या तिघांसोबत एक महिला त्यांच्या क्लिनिकमध्ये घुसली आणि डॉक्टरांना मारहाण करत या टोळीने त्यांच्याकडून दोन लाख रुपये उकळून पसार झाले. त्यानुसार, डॉ. शेट्टी यांनी पाचही आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, दोन महिलांसह पाचजणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर धमकावणे, खंडणी वसूल करणे आणि डॉक्टरला मारहाण, असे आरोप ठेवत अटक करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यानुसार न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडीत पाठविले असून, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.