‘ती’ला पूजा पडली ७० हजारांत; दागिन्यांऐवजी हाती आली गिट्टी
By प्रदीप भाकरे | Published: March 12, 2023 02:09 PM2023-03-12T14:09:34+5:302023-03-12T14:09:44+5:30
मंदिरात अज्ञातांकडून हातचलाखी, दोन अनोळखींविरुद्ध गुन्हा
अमरावती - एका महिलेला मंदिरातील पूजा तब्बल ७० हजारांमध्ये पडली. तिच्याकडील सोन्याचे दागिने हातचलाखीने घेऊन तिला दागिन्यांऐवजी गिट्टीचे खडे असलेली पुरचुंडी देण्यात आली. दर्यापुरातील संत गजानन महाराज मंदिरात ११ मार्च रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास हा प्रकार घडला.
दर्यापूर पोलिसांनी याप्रकरणी ४७ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून रात्री १०.१७ च्या सुमारास अनोळखी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दर्यापुरातील ती महिला शनिवारी सकाळच्या सुमारास परिसरातील संत गजानन महाराज मंदिरात पूजेसाठी गेली होती. तेथे आधीच असलेल्या दोघांनी तिला हेरले. पूजा करण्याच्या बहाण्याने त्या दोन अनोळखी आरोपींनी महिलेकडील तीन ग्रॅमची अंगठी, सोन्याचा गोफ असे एकूण ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने स्वत:कडे घेतले. त्या दागिन्यांची पुडी बांधून महिलेकडे दिली. ती पिशवीत ठेवण्याची सूचना करून आरोपी तेथून निघून गेले. काही वेळाने महिलेने स्वत:कडील पुडी पाहिली असता, तिला धक्का बसला. सोन्याच्या दागिन्यांऐवजी तिला त्या पुडीत गिट्टीचे खडे दिसून आले. त्या दोन अनोळखींनी हातचलाखी करून आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच महिलेने दर्यापूर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पुढील तपास ठाणेदार संतोष टाले यांच्या नेतृत्वात दर्यापूर पोलीस करीत आहेत.