BJP आमदार करण्याचे आमिष दाखवून लुटले चार कोटी, महिलेला अटक; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:56 PM2023-09-13T12:56:35+5:302023-09-13T12:58:14+5:30

उद्योगपतीची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी महिला कार्यकर्त्या चैत्र कुंडपुरा हिला अटक केली आहे.

woman cheating industrialist of rs 4 crore promising bjp ticket in karnataka assembly election | BJP आमदार करण्याचे आमिष दाखवून लुटले चार कोटी, महिलेला अटक; काय आहे प्रकरण?

BJP आमदार करण्याचे आमिष दाखवून लुटले चार कोटी, महिलेला अटक; काय आहे प्रकरण?

googlenewsNext

बंगळुरू : यावर्षी मे महिन्यात झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचे तिकीट मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेने उद्योगपतीची चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.  उद्योगपतीची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी महिला कार्यकर्त्या चैत्र कुंडपुरा हिला अटक केली आहे. या संदर्भात तक्रार आल्यानंतर स्पेशल विंग सिटी सेंट्रल ब्रांचच्या (सीसीबी) पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा आरोपी महिलेला अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चैत्र कुंडपुरा या महिलेने गोविंदा बाबू पुजारी यांना दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बांदूर विधानसभेतून भाजपकडून तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, आरएसएसच्या नेत्यांना ओळखते आणि ते तिला तिकीट मिळवून देऊ शकतात, असे दावा महिलेने केला होता. पोलिसांनी सांगितले की, पीडित गोविंदा बाबू पुजारी यांना ज्यावेळी चैत्र कुंडपुरा हिने बंगळुरूला बोलविले. त्यावेळी तिने काही लोकांसोबत अनेक बैठकाही घेतल्या. या बैठका भाजपच्या हायकमांडच्या पातळीवर निर्णय घेणाऱ्या असल्याचेही तिने गोविंदा बाबू पुजारी यांना सांगितले. 

याचबरोबर, चैत्र कुंडपुरा हिच्यावर उद्योगपती गोविंदा बाबू पुजारी यांनी चार कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, गोविंदा बाबू पुजारी यांना कर्नाटक विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी चैत्र कुंडपुरा हिच्याकडून पैसे परत करण्यास सांगितले. मात्र, तिने पैसे परत केले नाहीत. गोविंदा बाबू पुजारी यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत असा दावा केला आहे की, आरोपी महिलेने त्यांचे पैसे परत करण्यास नकार दिला आणि आपली फसवणूक केली.

याप्रकरणी स्पेशल विंग सिटी सेंट्रल ब्रांचच्या पोलिसांनी चैत्र कुंडपुरा हिला अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, चैत्र कुंडपुरा उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि हिंदुत्वाच्या अनुयायांमध्ये लोकप्रिय आहे. तिच्यावर द्वेषपूर्ण भाषणे केल्याचा आरोप असून याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पोलिसांनी याप्रकरणी चैत्र कुंडपुरा हिच्यासह गगन कदूर, श्रीकांत नायक आणि प्रसाद या साथीदारांनाही अटक केली आहे. तर उद्योगपती गोविंदा बाबू पुजारी हे बिलवा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते आणि नेते आहेत.  


 

Web Title: woman cheating industrialist of rs 4 crore promising bjp ticket in karnataka assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.