Video - संतापजनक! पुजाऱ्याने महिलेला मारलं, केस ओढून फरफटत नेलं, मंदिराबाहेर काढलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 12:54 PM2023-01-07T12:54:45+5:302023-01-07T12:55:41+5:30
सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये एक पुजारी महिलेच्या केसांना पकडून मंदिराच्या बाहेर काढताना दिसत आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका मंदिरात महिलेसोबत गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पुजारी एका महिलेचे केस ओढत तिला मंदिरातून बाहेर काढताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, ती महिला भगवान व्यंकटेश्वराची पत्नी असल्याचा दावा करत होती आणि मूर्तीशेजारी बसायचा हट्ट करत होती. महिलेला कंटाळून पुजाऱ्याने तिच्यासोबत असे वर्तन केल्याचे सांगितले जात आहे. 21 डिसेंबर रोजी ही घटना घडली. मात्र आता या घटनेचा व्हिडिओ खूप व्हायरल होत असल्याने उघडकीस आली आहे.
सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये एक पुजारी महिलेच्या केसांना पकडून मंदिराच्या बाहेर काढताना दिसत आहे. महिलेने विरोध करण्याचा प्रयत्न केल्यावर तो तिचा दुपट्टा पकडून तिला मंदिराच्या दरवाजाजवळ ओढून नेतो. तरीही महिलेला ऐकत नाही तर तो तिला कानाखाली मारतो. एवढेच नाही तर जेव्हा महिलेने पुन्हा मंदिरात येण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो तिला मारहाण करण्यासाठी रॉड उचलतो. मात्र दुसरी व्यक्ती त्याला रॉडने हल्ला करण्यापासून रोखते.
A Dalit woman is being assaulted and removed from the temple premises in Bangalore, India! pic.twitter.com/RkTiMT4yCe
— Ashok Swain (@ashoswai) January 6, 2023
पीडित महिलेने अमृतहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्तानुसार, महिला मंदिरातील भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीजवळ बसण्याचा आग्रह करत होती, परंतु मंदिराच्या पुजाऱ्याने तिला तसे करू दिले नाही. याचा राग येऊन महिलेने पुजाऱ्यावर थुंकल्याचे सांगितले जात आहे. हे पाहून मंदिरात उपस्थित असलेल्या व्यक्तीला राग आला आणि त्याने तिला बाहेर काढलं.
महिला मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, पोलीस प्रशासनाकडून अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया युजर्सनी महिलेसोबत झालेल्या वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"