उंदिर मारण्याचे औषध प्याल्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांनी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 09:11 PM2021-04-01T21:11:48+5:302021-04-01T21:12:19+5:30
Crime News : या महिलेने बुधवारी उंदिर मारण्याचे औषध खाल्ल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ती एका दवाखान्यात गेली.
दिग्रस (यवतमाळ) : येथील देवनगरमधील एका महिलेचा उंदिर मारण्याचे औषध खाल्ल्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.निलोफर बाबा खान (२८) रा.देवनगर, दिग्रस असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेने बुधवारी उंदिर मारण्याचे औषध खाल्ल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ती एका दवाखान्यात गेली.
काही वेळानंतर बरे वाटल्याने रात्री ती घरी परत गेली. गुरुवारी सकाळी पुन्हा त्रास सुरू झाला. त्यामुळे ती पुन्हा एका खासगी दवाखान्यात गेली. तत्पूर्वी पोलीस ठाणे गाठून तिने सासरच्यांविरुद्ध तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तिला आधी दवाखान्यात दाखल होवून उपचार घेण्याचा सल्ला दिला. नंतर तक्रार घेण्याची ग्वाही दिली.
या प्रकारानंतर दारव्हा तालुक्यातील सिंदी येथील माहेरची मंडळी दिग्रस येथे आली. त्यांनी तिला एका खासगी दवाखान्यात नेले. तेथे स्ट्रेचरवर टाकताच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. यानंतर संतप्त माहेरच्यांनी तिचा मृतदेह घेवून पोलीस ठाणे गाठले. निलोफरच्या सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान वृत्त लिहिस्तोवर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.