रेल्वेगेटवरील महिला गेट कीपरचा विनयभंग : आरोपी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:20 PM2020-02-22T23:20:46+5:302020-02-22T23:23:05+5:30
रात्रीची वेळ होती. सिंदी रेल्वेगेटवर एक महिला गेट कीपर कर्तव्यावर हजर होती. अचानक एक आरोपी रेल्वे गेटवर आला. त्याने या महिला कर्मचाऱ्याला एकटी पाहून तिचा विनयभंग केला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रात्रीची वेळ होती. सिंदी रेल्वेगेटवर एक महिला गेट कीपर कर्तव्यावर हजर होती. अचानक एक आरोपी रेल्वे गेटवर आला. त्याने या महिला कर्मचाऱ्याला एकटी पाहून तिचा विनयभंग केला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळाला. या घटनेमुळे रेल्वेत खळबळ उडाली असून महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
सीमा (बदललेले नाव) असे या महिला गेट कीपरचे नाव आहे. त्या नागपूर येथे राहत असून नागपूर विभागातील सिंदी रेल्वे गेट क्रमांक १०३ येथे ड्यूटीवर आहेत. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे त्या कर्तव्यावर गेल्या. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला. काही कळायच्यात आत त्याने या महिला कर्मचाऱ्याला पकडून तिचा विनयभंग केला. महिलेने आरडाओरड केल्यामुळे काही अंतरावर असलेल्या रेल्वे क्वॉर्टरमधील नागरिक मदतीसाठी धावले. परंतु तोपर्यंत अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पळून गेला होता. घटनास्थळापासून ५०० मीटर अंतरावर रेल्वेस्थानक आहे. भयभीत झालेल्या या महिलेने आरपीएफला घटनेची माहिती दिली. त्यांनी स्थानिक पोलिसांना मदत मागितली. परंतु पोलिसांनी हे प्रकरण आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी उशिरा या महिलेने नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. लोहमार्ग पोलिसांनी महिलेच्या तक्रारीची दखल घेत अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३५४ (बी) नुसार गुन्हा दाखल केला. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महिलांना रात्री ड्यूटीवर थांबविता येत नाही. परंतु गेट कीपरसारखी जबाबदारी महिलेस देणे आणि रात्री कर्तव्यावर ठेवणे याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.