महिलेला गस्तीवरील पोलिसांनी दिले जीवनदान; आत्महत्येसाठी तलावात उडी मारणाऱ्या तिला अडवले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 02:50 PM2021-03-07T14:50:36+5:302021-03-07T14:51:01+5:30
Attempt to Suicide : सदर महिलेस शहर पोलीस ठाण्यात आणून तीला समज देण्याचे काम सध्या सुरू आहे.
नितिन पंडीत
भिवंडी - शहरातील वऱ्हाळादेवी तलावात उडी मारून आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिसांच्या सतर्कतेने जीवनदान मिळाले आहे. महिलेला आत्महतेपासून रोखून तिचे प्राण वाचविलेल्या या दोन्ही पोलिसांचा पोलीस अधिकाऱ्यांसह शहरवासीयांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. तर सदर महिलेस शहर पोलीस ठाण्यात आणून तीला समज देण्याचे काम सध्या सुरू आहे.
लक्ष्मी व्यंकटराजन अनडम ( वय ३७ , रा. पद्मानागर ) असे आत्महत्या करण्यापासून रोखलेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला पती व मुलांसह पद्मानागर येथील बाबू शेठ चाळ येथे राहत असून घरात पती व मुलांच्या त्रासाला कंटाळून ती रविवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान शहरातील वऱ्हाळादेवी तलावात उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होती. याच वेळी या परिसरात गस्ती वर असलेल्या शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई राहुल पवार व संजय कोळी यांनी सदर महिलेस पाण्यात उडी मारण्यापूर्वीच अडवले व तिला आत्महत्या करण्यापासून रोखले. सदर महिलेस शहर पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता पती व मुलांच्या सततच्या त्रासाला कंटाळून तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती महिलेने पोलोसांना दिली असून महिलेच्या पतीने दुसरे विवाह केले असल्याची शंका देखील माहिलेने पोलीसांसमोर व्यक्त केली असून या महिलेची समज पोलिसांनी काढली असून घरातील व्यक्तींना देखील समज देण्याचे आश्वासन महिलेला देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई राहूल पवार व संजय कोळी यांचे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोवरच शहरवासीयांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. तर आम्ही आमचे कर्तव्य बजावले असून एका महिलेचा जीव जाण्यापासून वाचविले असल्याने समाधान वाटत आहे अशी प्रतिक्रिया पोलीस शिपाई राहुल पवार यांनी दिली आहे.