तीन महिन्यांत दिला दोन बाळांना जन्म, 'या' कारणासाठी केले हे प्रताप!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 07:03 PM2021-12-29T19:03:05+5:302021-12-29T19:05:06+5:30
दोन्ही वेळा या महिलेनं मुलाला जन्म दिला आणि विशेष म्हणजे आरोग्य विभागाला याची माहितीही नाही.
देशातील महिला आणि बालकांसाठी केंद्र सरकार आपल्या आरोग्य विभागाअंतर्गत (Health Department) विविध कल्याणकारी योजना (Welfare schemes) राबवत असतं. महिला आणि बालकांचं आरोग्य चांगलं रहावं, हा त्यामागचा उद्देश असतो. प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Centres) आणि आशा सेविकांच्या (Asha worker) माध्यमातून या योजना तळागाळापर्यंत पोहचवल्या जातात. मात्र, सरकारी खातं म्हटलं की त्याठिकाणी भ्रष्टाचाराची (Corruption) कीड ओघान येतेचं असा अनेकांचा अनुभव आहे. बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील उजियारपूर पीएचसीमध्ये (Ujiarpur PHC) असंच एक प्रकरण उघड झालं आहे.
एका महिलेनं आशा वर्करसोबत संगनमत करून तीन महिने १२ दिवसांच्या कालावधीत दोनदा मुलाला जन्म दिला अशी कागदपत्रं करून घेतली. दोन्ही वेळा या महिलेनं मुलाला जन्म दिला आणि विशेष म्हणजे आरोग्य विभागाला याची माहितीही नाही. जननी बाल सुरक्षा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी या महिलेनं हा प्रकार केल्याचं म्हटलं जात आहे.
सरकारी रेकॉर्डनुसार, संबंधित २८ वर्षीय महिला उजियारपूर ब्लॉकमधील हरपूर रेबारी गावाची रहिवासी आहे. याच गावातील आशा वर्कर रीता देवी यांच्या मदतीनं तिला २४ जुलै २०२१ रोजी पहिल्यांदा उजियारपूर पीएचसीमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. त्याच दिवशी या महिलेनं एका मुलाला जन्म दिला होता. डिलिव्हरी (Delivery) झाल्यानंतर या महिलेला जननी सुरक्षा योजनेचा (Janani Suraksha Yojana) लाभ म्हणून शासनानं निश्चित केलेली रक्कम देण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया नियमानुसार झाली. मात्र, तीन महिन्यांच्या कालावधीनंतर म्हणजेच ३ नोव्हेंबर २०२१ रोजी या महिलेला प्रसूतीसाठी पुन्हा उजियारपूर पीएचसीमध्ये दाखल करण्यात आलं. ४ नोव्हेंबर रोजी तिने एका मुलाला जन्म दिला व त्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला अशी कागदपत्रं तयार करण्यात आली. यावेळी जेव्हा जननी सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती जमा केली जात होती, तेव्हा या महिलेचं बिंग फुटलं.
नोव्हेंबरमध्ये उजियारपूर पीएचसीमध्ये प्रसूती झालेल्या महिलांना जननी बाल सुरक्षा योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम देण्यासाठी तपशील तयार केला जात होता. त्यावेळी पीएचसीचे क्लार्क (Clark) रितेशकुमार चौधरी यांना माहितीमध्ये काहीतरी गडबड जाणवली. त्यांनी रेकॉर्डची काळजीपूर्वक पाहणी केली असता सदर महिलेची जुलै महिन्यात देखील एकदा प्रसूती झाल्याचं निष्पन्न झालं. रितेशकुमार यांनी पीएचसीचे प्रभारी, रुग्णालय व्यवस्थापक, डीएएम आणि डीपीएम यांना याबाबत माहिती दिली.
या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर, सीएस (CS) डॉ. सत्येंद्र कुमार गुप्ता यांनी असंसर्गजन्य रोग विभागाचे अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी पथक तयार केलं आहे. 'उजियारपूर पीएचसीमध्ये तीन महिन्यांच्या काळात दोनदा प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चौकशी पथक नियुक्त करण्यात आलं आहे. पथकाच्या अहवालावरून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ही फसवणूक झाली आहे,' अशी माहिती समस्तीपूरचे सीएस डॉ. सत्येंद्र कुमार गुप्ता यांनी दिली.बिहारमध्ये उघड झालेल्या या प्रकरणामुळं सरकारी आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या घटना इतरही ठिकाणी होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.