महिला IAS वर होमगार्ड जवानाला मारहाण केल्याचा आरोप, रुग्णालयात उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 07:17 PM2023-05-31T19:17:55+5:302023-05-31T19:18:09+5:30
होमगार्ड जवानावर छापरा सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पाटणा : बिहारमधील छपरा येथे एका महिला IAS वर होमगार्ड जवानाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. येथील छपराच्या डीडीसी प्रियंका राणी यांनी होमगार्डचे जवान अशोक कुमार साह यांना रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे. होमगार्ड जवानावर छापरा सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ज्यावेळी डीडीसी निवासस्थानावर ड्युटीवर तैनात होतो, तेव्हा डीडीसी प्रियंका राणी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. यादरम्यान मी मुख्य दरवाजा उघडला. मग त्यांनी विचारले की तू इथे का आला आहेस, तर मी त्यांना सांगितले की इथे माझी ड्युटी आहे. त्यानंतर मुख्य रस्त्यावर जाऊन ड्युटी करा, असे त्यांनी मला सांगितले.
तेव्हा मी त्यांना सांगितले की, तेथे शस्त्रे लुटण्याची भीती आहे, त्यामुळे मी तेथे ड्युटी करू शकत नाही. यामुळे त्या चिडल्या आणि मला शिवीगाळ करू लागल्या. यासोबतच त्यांनी गाडीत ठेवलेल्या अॅल्युमिनियम तारच्या रॉडने मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांचा ड्रायव्हर आणि इतर जवानांनी मध्यस्थी करून मला वाचवले, असे अशोक कुमार साह यांनी म्हटले आहे.
दरम्यान, होमगार्ड जवान अशोक कुमार साह यांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. या घटनेनंतर होमगार्ड संघटनेत संताप व्यक्त होत आहे. होमगार्ड युनियनचे नेते सरन यांनी डीएम अमन समीर यांच्याकडे डीडीसीची तक्रार केली आणि न्यायाची मागणी केली आहे. युनियनच्या सदस्यांनी डीडीसीविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.
युनियनच्या अध्यक्षांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायाचे आश्वासन दिले असून योग्य ती कारवाई करण्याचे सांगितले आहे. तसेच, दोषी अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास कामावर बहिष्कार टाकणार असल्याचे होमगार्ड युनियनने सांगितले. त्यासोबतच मानवाधिकार आयोगाकडेही दाद मागणार आहे. दरम्यान छपराच्या डीडीसींची बाजू अद्याप समोर आलेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका वृत्तवाहिनीने त्यांना याबाबत विचारले असता, ज्यांनी त्यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे त्यांना विचारा, असे त्यांनी सांगितले. त्यांनी याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.