घरात घुसून महिलेची हत्या; डोंबिवलीच्या भरवस्तीतील घटना, मारेकऱ्याविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 11:08 AM2022-01-18T11:08:53+5:302022-01-18T11:10:14+5:30
अनोळखी मारेकऱ्याविरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
डोंबिवली : पूर्वेकडील टिळक चौक परिसरातील आनंद शीला सोसायटीत राहणाऱ्या विजया बाविस्कर (५८) यांची घरात घुसून हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. कोणीतरी तोंड दाबल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अनोळखी मारेकऱ्याविरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विजया या घरात एकट्याच राहत होत्या. सकाळी घरकाम करणारी महिला आली असता विजया यांच्या दरवाजाला बाहेरून कडी होती. कडी उघडून महिला घरात गेली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती तिने शेजाऱ्यांना दिली. त्यांनी तत्काळ याबाबत टिळक नगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलीस आयुक्त जयराम मोरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तोंड दाबल्याने विजया यांचा मृत्यू गुदमरून झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल, असे पोलिसांनी सांगितले.
विजया यांच्या संपर्कातील व्यक्तींची कसून चौकशी सुरू आहे. विजया या ३० वर्षांपासून घटस्फोटीत असून त्यांना चार बहिणी आहेत. त्यांच्या वडिलोपार्जित जागेवर इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने विजया या आनंद शिला या इमारतीत तीन ते चार वर्षांपासून भाड्याने राहात होत्या. हत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत
तपासाची दिशा मिळण्यासाठी आनंद शीला इमारतीच्या आजूबाजूला, दुकानांमध्ये तसेच इमारतींमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जात आहे.
शहरातील गजबजलेला भाग म्हणून परिचित असलेल्या टिळक चौकात असलेल्या बिल्डिंगमध्ये घडलेल्या या हत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.