कोल्लममधील महिलेचा मृत्यू सर्पदंशाने की हत्या?; पोलिसांनी पतीसह २ जणांना घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 11:47 AM2020-05-24T11:47:26+5:302020-05-24T11:48:13+5:30
उथराच्या मृत्यूबाबत डीवायएसपीच्या नेतृत्वात टीम तपास करत आहे. सर्पदंशातून उथरा हिची तब्येत सुधारत असताना पुन्हा तिला सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला.
कोल्लम – केरळ राज्यातील कोल्लम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी पोलिसांना ही हत्या असल्याचा संशय आला. आंचल येथे राहणाऱ्या उथरा हिच्या मृत्यूबद्दल पोलिसांना संशय वाटू लागल्याने पोलिसांनी तिचा नवरा सूरजसह अन्य दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
उथराच्या मृत्यूबाबत डीवायएसपीच्या नेतृत्वात टीम तपास करत आहे. सर्पदंशातून उथरा हिची तब्येत सुधारत असताना पुन्हा तिला सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. ७ मे रोजी उथरा हिची मृतदेह आंचल येथील घरात सापडला होता. त्याचदिवशी तिच्या कुटुंबीयांनी उथराच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला. उथरा ज्यावेळी बेडरुममधील बेडकडे जात होती तेव्हा ती रुम एसी असल्याने खिडक्या वैगेरे बंद होत्या. मग साप त्या खोलीत आलाच कसा? असा संशय त्यांनी व्यक्त केला.
उथराच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी ग्रामीण एसपी हरिशंकर यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता उथरा हिचा नवरा सूरज हा साप पकडणाऱ्या टोळीशी संपर्कात असल्याचं समोर आलं. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सूरजसह दोघांना अटक केली. सध्या या संशयित आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत या प्रकाराचा छडा लावला जाईल अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली.