महिला वकिलाला व्हिडीओ कॉलसमोर केले विवस्त्र; शरीरावरील जखमा, बुलेट मार्क तपासण्याचा बहाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 06:24 AM2024-09-14T06:24:00+5:302024-09-14T06:24:19+5:30

साकीनाका येथे राहणाऱ्या महिला वकिलास मोबाइलवर एकाने फोन करत तो टेलिकॉम ऑथरिटीने ऑफिसमधून बोलत असल्याचा दावा केला.

Woman lawyer stripped on video call; A pretext for examining body wounds, bullet marks | महिला वकिलाला व्हिडीओ कॉलसमोर केले विवस्त्र; शरीरावरील जखमा, बुलेट मार्क तपासण्याचा बहाणा

महिला वकिलाला व्हिडीओ कॉलसमोर केले विवस्त्र; शरीरावरील जखमा, बुलेट मार्क तपासण्याचा बहाणा

मुंबई - मनी लाॅण्ड्रिंग गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या महिला साथीदारापैकी तुम्ही आहात, त्यांच्या अंगावर असलेली लहान हत्यारे आणि त्यामुळे झालेल्या जखमा किंवा बुलेट मार्क तुमच्या व अंगावरही आहेत का, हे आम्हाला पाहायचे आहे, असे सांगत शारीरिक तपासणीच्या नावाखाली ३६ वर्षीय महिला वकिलाला व्हिडीओ कॉलसमोर विवस्त्र होण्यास भाग पाडले गेले. तसेच त्यांच्याकडून ५० हजार रुपये उकळले. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंदवला आहे.

साकीनाका येथे राहणाऱ्या महिला वकिलास मोबाइलवर एकाने फोन करत तो टेलिकॉम ऑथरिटीने ऑफिसमधून बोलत असल्याचा दावा केला. तुमच्या मोबाइल सिम कार्डमार्फत मनी लाॅण्ड्रिंग केली जात असून, नंबर ब्लॉक करण्याची भीती घातली. तसेच तुमच्या विरोधात अंधेरी पोलिसात एफआयआर दाखल झाला असून, त्यांच्याकडून स्पष्टीकरण येताच तुमचा फोन बंद करणार नाही, असे सांगितले. आरोपीने अंधेरी पोलिस अधिकारी म्हणून अनोळखी व्यक्तीला कॉन्फरन्स कॉल कनेक्ट केला. 

फोनवरील व्यक्तीने आपण सायबर सेलचा प्रमुख असून, तुमच्या कॅनरा बँकेतील खात्यात मनी लाॅण्ड्रिंग झाल्याचे त्याने सांगितले. मात्र, माझे खाते नसल्याचे तक्रारदाराने स्पष्ट केल्यावर वरिष्ठांनी तुम्हाला तात्काळ अटक करायला सांगितले असून, तुम्ही चौकशीत सहकार्य केले, तर मी तुमची मदत करू शकतो, असे तो म्हणाला.

हॉटेलमधील रूम घेतली भाड्याने आरोपींनी तक्रारदाराला तुमची गुप्त चौकशी सुरू असून, तुमच्या शिवाय कोणीही नसेल, अशा ठिकणी जा, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने पवईच्या एका हॉटेलमध्ये रूम भाड्याने घेतली. तेथे व्हिडीओ कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तीने या केसमध्ये नरेश गोयल हा मुख्य आरोपी असून, त्याच्या साथीदार महिलांच्या अंगावर छोटी हत्यारे ठेवलेली होती. तसेच शरीरावर जखमांचे व बुलेट लागल्याचे मार्क आहेत. त्यामुळे आमच्या महिला अधिकारी व्हिडीओ कॉलवर त्या खुणा तपासतील, असे सांगत शारीरिक तपासणीच्या नावाखाली वकिलाला व्हिडीओ कॉल समोर कपडे काढायला सांगितले. त्यांनी तसेच केल्यावर त्यांच्याकडून ५० हजार रुपये ऑनलाइन उकळले गेले. तक्रारदाराने घडला प्रकार पतीला सांगितला.

पैसे देण्यास नकार देताच पाठवले फोटो
महिला वकिलास अनोळखी मोबाइल क्रमांकावरून व्हाॅट्सॲप कॉल आणि मेसेज येतच होते. पैशाची मागणी केली असता त्यांनी नकार देताच त्यांना त्यांचे फोटो पाठवले गेले. अखेर तक्रारदाराने पवई पोलिसांत तक्रार दिल्यावर बीएनएस कायद्याचे कलम ३१९(२),३१८(४),३(५) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७,६६(इ), ६६(ड),६६(सी) अंतर्गत दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Woman lawyer stripped on video call; A pretext for examining body wounds, bullet marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.