दोन हजारांच्या रिफंडसाठी गृहिणीला गमवावे लागले सव्वा लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 05:52 AM2021-07-12T05:52:09+5:302021-07-12T05:54:45+5:30
चेंबूर येथील गृहिणीची झाली फसवणूक. पोलिसांकडून तपास सुरू.
मुंबई : दोन हजार रुपयांच्या रिफंडसाठी चेंबूर येथील गृहिणीवर सव्वा लाख रुपये गमावण्याची वेळ आली. याप्रकरणी चेंबूरपोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात शनिवारी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
चेंबूर परिसरात ४१ वर्षीय तक्रारदार गृहिणी राहते. त्यांच्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या खरेदीसाठी गेले असताना एका दुकानात २ हजार रुपयांचे गुगल पे केले. खात्यातून रक्कम वजा झाली असतानाही दुकानदाराला ती न मिळाल्याने अर्धेच सामान घेऊन तेथून जावे लागले. गुगलवरून मिळवलेल्या नंबरवर फोन केल्यानंर समोरच्याने सांगितल्याप्रमाणे महिलेने एनी डेस्क ॲप डाऊनलोड करताच ओटीपी येऊ लागले. तिने ते ओटीपीही त्यांना शेअर केले.
त्यानंतर त्यांच्या खात्यातून १ लाख ३४ हजार वजा झाले. त्यांनी याबाबत फोनवर बोलणाऱ्याकडे विचारणा करताच त्याने उडवाउडवीची उत्तरे देत फोन बंद केला. त्यांनी बँकेत विचारणा करता तो ग्राहक सेवा क्रमांक नसल्याचे समजले.
- आठवडा उलटून गेला तरीही पैसे रिफंड न झाल्याने महिलेने गुगलवरून बँकेचा ग्राहक सेवा नंबर मिळवला.
- तेथे संपर्क साधून त्यांनी गुगल पे द्वारे पैसे रिफंड करण्याबाबत विचारणा केली. तेव्हा फोन घेणाऱ्या संबंधिताने एनी डेस्क नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले.