दादरला महिलेचं मंगळसूत्र हिसकावलं अन् चेंबूरला आरोपी झाला गजाआड...
By गौरी टेंबकर | Published: September 14, 2022 07:32 PM2022-09-14T19:32:41+5:302022-09-14T19:34:08+5:30
१२ तासांत दादर जीआरपीने केली कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दादर रेल्वे स्थानकावरून डोंबिवलीला जाण्यासाठी लोकल पकडत असताना एका महिलेच्या गळ्यातून अडीच लाखांचे दागिने हिसकावून सराईत पसार झाला होता. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर दादर रेल्वे पोलिसांनी अवघ्या १२ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. शेखर विजय शिंदे (३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्रकरणातील तक्रारदार श्रीराम मुलकुटला हे ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या पत्नीसह डोंबिवलीला जाण्यासाठी दादरला साडे चारच्या सुमारास लोकल पकडत होते. त्यावेळी पत्नीच्या गळ्यातील सव्वा दोन लाखांचे मंगळसूत्र अज्ञात व्यक्तीने हिसकावत पळ काढला. याची तक्रार त्यांनी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने तपास सुरू करत सीसीटिव्ही फुटेज पडताळले. त्यावेळी आरोपीची ओळख पटली आणि तो अभिलेखावरील गुन्हेगार शिंदे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार त्याचा माग काढत चेंबूर परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबूली दिली. तेव्हा त्याच्या कडून चोरीला गेलेले मंगळसूत्र ढाकणे यांच्या पथकाने हस्तगत केले. ते तक्रारदाराला पोलिसांनी परत केले म्हणून कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले आहेत.