उपसरपंचाकडून महिलेचा विनयभंग, कामावरून काढून टाकण्याची धमकी
By योगेश पांडे | Published: July 8, 2024 07:54 PM2024-07-08T19:54:02+5:302024-07-08T19:54:44+5:30
संबंधित आरोपीने महिलेची अनेक दिवस छेडखानी केली व तिने ऐकले नसता तिला कामावरून काढण्याची धमकी दिली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
नागपूर : पांजरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाविरोधात एका महिलेने छळवणूकीची तक्रार केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीने महिलेची अनेक दिवस छेडखानी केली व तिने ऐकले नसता तिला कामावरून काढण्याची धमकी दिली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
महेश धर्मेंद्र भोयर (रुई पांजरी, वर्धा मार्ग) असे आरोपी उपसरपंचाचे नाव आहे. भोयर संबंधित महिलेला वारंवार फोन करून त्रास द्यायचा व रात्री अपरात्री तिच्या घराजवळून जाणुनबुजून फेऱ्या मारायचा. महिला कामावर असताना भोयर तेथे पोहोचून तिला वाईट पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. तिने हटकल्यावर त्याने अनेकदा तिला कामावरून काढून टाकले जाईल अशी धमकी दिली होती. ३० जून रोजी संबंधित महिला तिच्या कार्यालयात जेवण करत असताना भोयर तिच्याजवळ गेला व तिच्याशी अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तिला कामावरून काढून टाकण्याची धमकीदेखील दिली.
महिलेने या प्रकारानंतर पोलिसांत तक्रार करण्याचे टाळले. मात्र ५ जुलै रोजी रात्री दीड वाजता भोयरने महिलेच्या पतीला एसएमएस केला. दुसऱ्या दिवशी महिला व पती त्याच्या घरी गेले असता भोयरने दोघांनाही अश्लिल शिवीगाळ करत परत तिला कामावरून काढण्याची धमकी दिली. अखेर महिलेने हिंमत करून बेलतरोडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपी भोयरविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ७५ व ७८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.