जहाल महिला नक्षलवादी पार्वती सडमेक हिला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 08:37 PM2019-12-07T20:37:13+5:302019-12-07T20:39:43+5:30
२४ गुन्ह्यातील आरोपी : सहा लाखांचे होते बक्षीस
गडचिरोली - विविध प्रकारच्या २४ गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेली जहाल महिला नक्षलवादी पार्वती उर्फ सुशिला शंकर सडमेक (२४ वर्ष) हिला अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले. ती नक्षल चळवळीत भामरागड एरिया कमिटी मेंबर या पदावर कार्यरत होती. तिच्यावर शासनाने ६ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
शुक्रवार दि.६ रोजी तिला भामरागड तालुक्यातील नैनवाडी येथील डुंडा कोमटी मडावी यांच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. शनिवारी (दि.७) न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पार्वती सडमेक हिच्या अटकेसाठी शासनाने ६ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात तिच्यावर २४ गंभीर गुन्हे दाखल असून याशिवाय तिचा आणखी किती गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे.याचा तपास पोलीस करत आहेत.
अवघ्या ११ वर्षाच्या वयात झाली नक्षलवादी
२००६ मध्ये म्हणजे अवघ्या ११ वर्षाच्या वयात पार्वती नक्षल दलममध्ये भरती झाली होती. २००८ पर्यंत ती दलम सदस्य पदावर तर २००८ ते २०१० या कालावधीत जहाल नक्षली नेता नर्मदा हिची अंगरक्षक म्हणून काम पाहात होती. २०१० ते २०१२ यादरम्यान ती गट्टा (जां) दलममध्ये दलम कमांडर रामको याच्यासोबत महिला संघटनेचे काम पाहात होती. २०१२ ते २०१४ या कालावधीत भामरागड दलम उपकमांडर पदावर काम पाहिल्यानंतर २०१४ पासून एरिया कमिटी मेंबर म्हणून ती कार्यरत होती.