अत्याचार, हत्या प्रकरणातील आरोपी राम रहीमवर सरकार मेहरबान; सातव्यांदा पॅरोल मंजूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 18:19 IST2023-07-20T18:18:59+5:302023-07-20T18:19:42+5:30
भाजपा सरकारने ३० महिन्यांत सात वेळा पॅरोलला दिली मंजुरी

अत्याचार, हत्या प्रकरणातील आरोपी राम रहीमवर सरकार मेहरबान; सातव्यांदा पॅरोल मंजूर!
Gurmeet Ram Rahim: बलात्कार आणि दोन हत्यांच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमवर हरयाणाचे मनोहरलाल खट्टर सरकार पुन्हा एकदा मेहरबान झाल्याचे दिसत आहे. एकीकडे गेल्या काही महिन्यांपासून देशातील विविध राज्यांत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, हरयाणा सरकारने राम रहीमला पुन्हा एकदा पॅरोल मंजूर केला आहे. यावेळी त्याला 30 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यातही त्याला पॅरोल देण्यात आला होता. त्या दरम्यान तो 40 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता.
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला पॅरोल मिळाला असला तरीही, त्याला दरवेळेप्रमाणे सिरसा डेऱ्यात जाण्याची परवानगी नाही. राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तो बलात्कार आणि दोन खून केल्याप्रकरणी दोन बहिणींसह दोषी आढळला. त्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, सरकारने राम रहीमवर मेहरबानी करणे सुरूच ठेवले आहे. पॅरोल मिळण्याची ही त्याची पहिलीच वेळ नाही. याआधीही तो अनेकदा पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला आहे. राम रहीमला 30 महिन्यांत 7व्यांदा पॅरोल मिळाला आहे. खून आणि बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी आढळूनही सरकारने राम रहीमबद्दल म्हटले होते की तो अट्टल गुन्हेगार नाही.
डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगच्या पॅरोलविरोधात मार्च 2023 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत त्याला अट्टल गुन्हेगार संबोधण्यात आले होते. यावर उत्तर दाखल करताना राज्य सरकारने राम रहीम हा अट्टल गुन्हेगार नसल्याचे सांगितले होते. सरकारने हायकोर्टात उत्तर देताना सांगितले होते की, राम रहीमला ज्या दोन स्वतंत्र हत्येप्रकरणी शिक्षा झाली आहे, त्यांना सीरियल किलिंग म्हणता येणार नाही. गुरमीत हा हल्लेखोर नव्हता आणि त्याने दोन्ही घटनांमध्ये प्रत्यक्ष खून केलेला नाही.