महिलेने १६ वर्षीय मुलाचे केले लैंगिक शोषण; पॉक्सोचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 08:47 PM2019-08-15T20:47:08+5:302019-08-15T20:55:08+5:30
नेहरूनगर पोलिसांनी या महिलेवर बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई - कुर्ला येथे राहणाऱ्या ३८ वर्षांच्या विवाहित महिलेने १६ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. या महिलेविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कोर्टाने तिला २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कुर्ला येथून १६ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नेहरूनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. दरम्यान आरोपी महिला देखील बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने दाखल केली होती. नाश्ता करून येतो असे सांगून हा मुलगा २९ जुलैला सकाळी घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर हे दोघे वांद्रे रेल्वे स्थानकात भेटले. तेथे या महिलेने त्याचा व स्वत:चा मोबाईल आणि सिम कार्ड नष्ट केले. त्यानंतर ते दोघेही दिल्लीला गेले. तेथे घर मिळविण्यास अडसर येऊ लागल्याने ते गुजरातमधील वडोदरा आणि त्यानंतर नवसारीला आले. त्याठिकाणी ते दोघे ११ ऑगस्टपर्यंत राहिल्यानंतर ते पुन्हा मुंबईत आले.
बेपत्ता होण्यापूर्वी हा मुलगा संबंधित महिलेच्या संपर्कात असल्याचे पोलीस तपासात समजले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. हे दोघे कुर्ला येथे रेल्वे मार्गालगतच्या झोपडपट्टीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. या महिलेने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप मुलाने केला आहे. त्याच्या जबाबानुसार नेहरूनगर पोलिसांनी या महिलेवर बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.