शेजाऱ्याने फोन करून बोलावले महिलेला; चाकूने सपासप वार करून केले गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 08:31 PM2021-06-04T20:31:22+5:302021-06-04T20:31:56+5:30
Attempt to Murder : दिल्लीतील रोहिणी सेक्टर ११ मध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दिल्लीत महिलेवरही चाकू हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेजाऱ्यानेच या महिलेला घराजवळ बोलावून हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून आरोपी शेजाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचे नाव नरेश उर्फ राजू आहे.
दिल्लीतील रोहिणी सेक्टर ११ मध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. २८ वर्षीय महिलेवर तिच्याच शेजाऱ्याने चाकू हल्ला केला. सपासप वार झाल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुरुवारी रात्री ८. ३० वाजण्याच्या सुमारास शाहाबाद डेअरी पोलीस ठाण्याला याविषयी माहिती मिळाली होती.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. आरोपीने महिलेला फोन करुन घराबाहेर बोलावले होते. त्यावेळी भररस्त्यातच त्याने तिच्यावर चाकूने वार केले. पीडितेच्या नाकेवाईकांच्या माहितीनुसार आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाल्याची थरारक घटना दिल्लीमध्ये मंगळवारीच घडली होती. १९ वर्षीय तरुणावर चौघांनी भर रस्त्यात हल्ला केला होता. जखमी तरुणाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. एकाच तरुणीवर असलेल्या प्रेमामुळे आरोपी आणि मृत तरुणामध्ये वाद होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना ताजी असतानाच सदरची घटना घडल्याने खळबळ माजली आहे.