भयंकर ! फक्त दहा तोळे दागिन्यांसाठी वृध्देचा निर्घृण खून, केले तुकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 11:38 AM2021-02-10T11:38:08+5:302021-02-10T18:33:16+5:30
Kolhapur Crime News : दहा तोळे दागिन्यांसाठी एका वृध्देचा निर्घृण खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते सरनोबतवाडी टोल नाका ते राजाराम तलाव मार्गावरील कृषी विद्यापीठाच्या माळावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला.
कोल्हापूर : दहा तोळे दागिन्यांसाठी एका वृध्देचा निर्घृण खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते सरनोबतवाडी टोल नाका ते राजाराम तलाव मार्गावरील कृषी विद्यापीठाच्या माळावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला.
शांताबाई शामराव आगळे - गुरव (वय ७०, रा. जगतापनगर, पाचगाव, ता. करवीर) असे खून झालेल्या वृध्देचे नाव आहे. दिवसभर शाेधाशोध करून पोलिसांना मृतदेहाचे शीर, डावा हात, कमरेखालील पायापर्यंतचा भाग असे तीन अवशेष वेगवेगळ्या गोणपाटात सापडले. पोलिसांनी तातडीने शोधाशोध करून काही तासातच मृतदेहाची ओळख पटवून सतीश परीट (२७, रा. माळी कॉलनी, राजारामपुरी, कोल्हापूर, मूळ गाव इचलकरंजी) या संशयितास ताब्यात घेतले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी सरनोबतवाडी टोल नाका ते राजाराम तलाव या मार्गावर कृषी विद्यापीठाच्या माळरानावर काहीजण मॉर्निंग वॉक करत होते. त्यांना कचऱ्याच्या ढिगामध्ये गोणपाटात गुंडाळलेला महिलेचा मृतदेह आढळला. राजारामपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोणपाटातून मृतदेह बाहेर काढला असता, फक्त कमरेखालील पायापर्यंतचा भाग आढळला. त्यामुळे महिलेचा खून झाल्याचे स्पष्ट झाले.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी जिल्ह्यातील गेल्या आठ दिवसातील मिसिंग व्यक्तींबाबत वायरलेसवरून माहिती घेतली. त्यावेळी करवीर पोलीस ठाण्यात पाचगावची शांताबाई आगळे ही वृध्दा शुक्रवारपासून (दि. ५) बेपत्ता असल्याचे आढळले. त्यांच्या मिरजकर तिकटी येथील अनिता जगताप व महावीर महाविद्यालय परिसरातील शर्मिला साळोखे या दोन्हीही मुलींना तातडीने बोलावले.
दरम्यान, पोलिसांनी इतर अवशेषांची शोधाशोध केली असता, कृषी विद्यापीठाच्या माळावरच बाभळीच्या झाडाच्या बुंध्यात एका गोणपाटात वृध्देचा डावा हात, तर तेथून १०० मीटर अंतरवर खुरट्या झुडपात शीर सापडले. पोलिसांनी मृत आगळे यांच्या मुलींना मृतदेह दाखवताच त्यांनी तो आपल्या आईचा असल्याचे सांगितले.
दरम्यान, मृताची मुलगी शर्मिला साळोखे यांच्या घरी इस्त्रीचे कपडे देण्यासाठी सतीश परीट याचा वावर होता. त्यातून त्याची शांताबाई आगळे यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने पाहून शुक्रवारी सकाळी परीट आगळे हा त्यांच्या पाचगावमधील घरी जाऊन, त्यांना मोपेडवरून घेऊन गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी परीट याला ताब्यात घेतले. त्यानंतर खुनाचा उलगडा झाला. मृतदेहाचे तुकडे कोठे व कसे केले, ते कोठे-कोठे फेकले, आणखी कोण सहभागी आहे का, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.