चार महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 09:07 PM2021-02-24T21:07:41+5:302021-02-24T21:10:14+5:30
Kidnapping Case : चाकण पोलीस : अपहृत बाळाची सुखरुप सुटका
पिंपरी : गर्भपात झाल्याचे पती व घरच्यांपासून लपवून चार महिन्यांच्या चिमुकलीला घरातून पळवून नेणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिलेच्या ताब्यातून बाळाची सुखरून सुटका करण्यात आली आहे. बाळ पळवून नेल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी चाकण येथे घडली होती.
राणी शिवाजी यादव (वय २८, रा. कुत्तर विहीर, आंबेजोगाई, जि. बीड), असे आरोपी महिलेचे नाव आहे. धनश्री राजेंद्र नागपुरे (वय चार महिने) असे चिमुकलीचे नाव आहे. याबाबत राजेंद्र प्रभाकर नागपुरे (वय ५३, रा. चाकण) यांनी फिर्याद दिली होती.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागपुरे राहत असलेल्या ठिकाणी आरोपी महिला १७ फेब्रुवारी रोजी काम मिळवण्याच्या बहाण्याने आली. त्यानंतर नागपुरे यांची मुलगी धनश्री हिला घरातून घेऊन निघून गेली. याबाबत गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. बाळाचे अपहरण करणारी महिला बालाजीनगर, मेदनकरवाडी येथे गुन्हा घडण्यापूर्वी काही दिवस राहण्यास होती. मात्र, गुन्हा घडल्यानंतर ती बेपत्ता आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. संशय बळावल्याने आरोपी महिलेचे रेखाचित्र तयार करून तिचा पोलिसांनी शोध सुरू केला. आरोपी महिलेला पोलिसांनी अंबेजोगाई येथून चार महिन्यांच्या बाळासह ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने बाळाचे अपहरण केल्याचे सांगितले.
बाळाचे जन्मदाते वेगळेच
फिर्यादी राजेंद्र नागपुरे व त्यांची पत्नी हे दाम्पत्य अपहृत बाळाचे जन्मदाते नाहीत, ही बाब तपासात समोर आली. पुण्यात शिक्षण घेत असलेल्या एका जोडप्याला प्रेमसंबंधातून हे बाळ झाले होते. त्या जोडप्याने नागपुरे दाम्पत्याच्या नावाचा वापर करून चाकण येथील एका दवाखान्यात बाळाला जन्म घातला. त्यानंतर नागपुरे यांना ते बाळ देऊन टाकले. बाळाचा सांभाळ करत असले तरी नागपुरे हे त्याचे जन्मदाते नसून अन्य जोडपे असल्याचे समोर आले.
बाळाला सांभाळण्याचा केला बहाणा
आरोपी राणी हिचा गर्भपात झाला. मात्र त्याबाबत घरच्यांना सांगितले नाही. त्यामुळे तिला एका नवजात बाळ पाहिजे होते. दरम्यान, नागपुरे हे बाळाचा सांभाळ करण्यासाठी एका महिलेच्या शोधात होते. याबाबत आरोपी राणी हिला माहिती मिळाली. बाळाला सांभाळण्याच्या बहाण्याने नागपुरे यांच्याकडे आल्यानंतर चार महिन्यांच्या धनश्री हिला घेऊन ती पळून गेली.