सराफ दुकानात चोरी करणाऱ्या महिलेस पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 07:13 PM2018-11-10T19:13:39+5:302018-11-10T19:13:58+5:30
७७ हजारांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
लातूर - शहरातील भुसार लाईन परिसरात असलेल्या एका सोन्या - चांदीच्या दुकानातून नोकर व मालकाची नजर चुकवून मिनी गंठण पळविणाऱ्या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेविरोधात गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात असलेल्या भुसार लाईन येथील तापडीया ज्वेलर्स येथे ४ नोव्हेंबर रोजी एक महिला दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आली. दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन त्या अनोळखी महिलेने नोकर आणि मालकांची नजर चुकवून विक्रीसाठी ठेवलेले मिनी गंठण (१६़९० ग्रॅम, किंमत ५१ हजार ४०० रूपये) लंपास केले़. रात्रीच्या वेळी दुकान बंद करताना दागिन्यांची पडताळणी केली असता मिनी गंठण चोरीला गेल्याचे मालक आणि नोकरांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी दुकानातील सिसिटीव्ही फुटेजची पाहणी केली. एका अनोळखी महिलेने गंठण चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने या संदर्भात पोलीसनाला माहिती दिली. पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांनी या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नागरगोजे यांना सूचना केल्या. सिसिटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर पथकाने ‘त्या’ अनोळखी महिलेचा शोध सुरू केला. दरम्यान, एका खबऱ्यामार्फत त्यांना या महिलेसंदर्भात माहिती मिळाली़. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली़. या महिलेकडून चोरीस गेलेले गंठण व इतर दागिने असा एकूण ७६ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पथकात सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुनील रेजितवाड, पोलीस नाईक शमशोद्दीन काझी, रवि गोंदकर, यशपाल कांबळे, महिला पोलीस नाईक सुदामती वंगे-यादव, चालक नागनाथ जांभळे यांचा समावेश होता.