पैंजणामुळे उकलले महिलेच्या हत्येचे गूढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 06:10 PM2019-01-24T18:10:51+5:302019-01-24T18:18:45+5:30
काशिमीरा येथील अर्धवट जळलेल्या मृतदेहाचा तिढा सुटला
मीरा रोड - काशिमीरा येथील जंगलात काही दिवसांपूर्वी अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडलेल्या एका महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलले आहे. या हत्येची उकल ही महिलेच्या पायातील पैंजणमुळे झाली आहे. ही महिला नालासोपारा येथे राहणारी होती असून अनैतिक संबंधातून तिच्या प्रियकराने तिची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वीच काशिमीरा येथील जंगलात एका महिलेचा अर्धवट जळलेला स्थितीत मृतदेह पोलिसांना सापडला होता. या प्रकरणाचा काशिमीरा पोलिसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेने देखील तपास सुरू केला होता. निर्मला यादव असं या महिलेचं नाव असून नालासोपारा येथे एका व्यक्तीसोबत लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होत्या. श्रीराम नगर परिसरात किराणा मालाचे दुकान चालवत होती. विवाहित असलेला अब्रार नेहमी त्यांच्या दुकानात येत असे. या ओळखीतूनच त्यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध जुळले.
काही दिवसांनी निर्मला यांनी अब्रारकडे लग्न करण्याचा तगादा लावण्यास सुरुवात केली. परंतु, अब्रार नेहमी टाळत असे. अब्रारने लग्न न केल्यास त्याच्या कुटुंबाला प्रेमसंबंधाची माहिती देण्याची धमकी निर्मला यांनी दिली. यानंतर अब्रारने निर्मला यांची हत्या करण्याचा कट आखला. १५ जानेवारीला निर्मला पुण्याला नातेवाईकाच्या लग्नासाठी निघाल्या होत्या. रस्त्यात असताना तिला अब्रारचा फोन आला. लग्नासंबंधी चर्चा करायची असल्याने घोडबंदर येथील फाऊंटन हॉटेलजवळ भेटण्यास अब्रारने त्यांना बोलावले.
दोघे भेटल्यानंतर अब्रार तिला जंगलात घेऊन गेला. त्या ठिकाणी दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि अब्रारने निर्मला यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. ओळख पटू नये म्हणून निर्मला यांच्यासोबत असलेल्या कपडय़ाची बॅग मृतदेहावर ठेवून अब्रारने पेटवून दिले आणि हत्या केल्यानंतर तो गुलबर्गा येथील आपल्या गावी पळून गेला. सोमवारी अब्रार नालासोपारा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला पोलिसांनी नालासोपारा रेल्वे स्थानकातच बेड्या ठोकल्या.