म्हैस चारण्यास गेलेल्या महिलेची गळा चिरून हत्या; पाय छाटून चोरट्यांनी लंपास केले पैंजण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 07:58 PM2021-11-23T19:58:51+5:302021-11-23T20:09:22+5:30
Murder Case : जयपूर ग्रामीणचे एसपी शंकर दत्त शर्मा यांनी सांगितले की, ती महिला म्हैस चरायला गेली असताना अज्ञात हल्लेखोरांनी तिच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी महिलेचे पाय कापून तिच्या पायातील चांदीची पैंजण चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपूर येथील खाटेपुरा येथे अज्ञात हल्लेखोरांनी एका महिलेचा गळा चिरून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी महिलेच्या हत्येनंतर ग्रामस्थांनी धरणे धरत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.
३० पथके हल्लेखोरांचा शोध घेत आहेत
जयपूर ग्रामीणचे एसपी शंकर दत्त शर्मा यांनी सांगितले की, ती महिला म्हैस चरायला गेली असताना अज्ञात हल्लेखोरांनी तिच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी महिलेचे पाय कापून तिच्या पायातील चांदीची पैंजण चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. प्राथमिक तपासात ही चोरीची घटना असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांची ३० पथके हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
संतप्त ग्रामस्थ आरोपींना तात्काळ अटक करा, नुकसान भरपाई आणि कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी द्या अशी मागणी करत आहेत. गीता देवी नावाच्या महिलेचे वय ५५ वर्षे होते. गावकरी तेथून मृतदेह नेऊ देत नाहीत. आम्ही ग्रामस्थ आणि कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
महिलांवरील गुन्ह्यात राजस्थान अव्वल : भाजप
दरम्यान, भाजपचे राज्यसभा सदस्य किरोडीलाल मीणा यांनी या मुद्द्यावरून काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उद्देशून त्यांनी ट्विट केले की, 'तुम्हा महिलांना उत्तर प्रदेशमध्येच असुरक्षित वाटत आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये राजस्थान देशात अव्वल असल्याची लाजिरवाणी वस्तुस्थिती आहे. महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून राज्याचे प्रमुख केवळ त्यांच्याच कामकाजात व्यस्त असल्याचा आरोप मीना यांनी केला.
त्याचवेळी भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांनी राजस्थानमध्ये अशा घटना सर्रास घडल्या असून त्या मीडियात येऊ नयेत म्हणून लपवल्या जात असल्याचं म्हटलं आहे. गुन्हेगारांचा वावर एवढा वाढला आहे की पोलिसांचा धाक उरलेला नाही. ते केवळ मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. काँग्रेस सरकार स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.