सोफा कम बेडमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; पतीसह पोलिसांनाही बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 10:09 AM2022-02-17T10:09:05+5:302022-02-17T10:09:18+5:30
दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरातील ओम रेसिडेन्सी बिल्डिंगमध्ये बी विंगमध्ये राहणारे किशोर शिंदे सकाळी कामावर गेले
डोंबिवली : पूर्वेतील दावडी परिसरात राहणारी सुप्रिया शिंदे (वय ३३) हिची हत्या करून तिचा मृतदेह घरातील सोफा कम बेडमध्ये लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली.
सुप्रियाचा पती किशोर कामावर गेला होता, तर मुलगा शाळेत गेला होता. दुपारी १२.३० ते सायंकाळी ५.३० च्या दरम्यान हत्येचा प्रकार घडला. आरोपी सुप्रियाच्या परिचयाचा असावा, असा अंदाज आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांत किशोर याच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची तीन ते चार पथके नेमली आहेत.
दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरातील ओम रेसिडेन्सी बिल्डिंगमध्ये बी विंगमध्ये राहणारे किशोर शिंदे सकाळी कामावर गेले. त्यांची पत्नी सुप्रिया ही घरात एकटीच होती. मुलगा दुपारी १२.३० वाजता शाळेत गेला होता. सुप्रियाची तब्येत बरी नसल्याने शेजारी राहणाऱ्या महिलेला तिने मुलाला शाळेत सोडण्यास सांगितले. सायंकाळी ५.३० वाजता मुलगा शाळेतून घरी आला असता, दार वाजवूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला असता, सुप्रिया घरात कुठेही दिसली नाही. ही माहिती किशोरला देण्यात आली. त्यानेही नातेवाइकांकडे चौकशी केली, पण तिचा शोध लागला नाही. अखेर किशोरने पत्नी हरवल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, सोफा कम बेडवरील चादर विस्कटलेली दिसली. त्यामुळे त्यांनी तो उघडला असता, सुप्रिया हिचा मृतदेह सोफ्यात कोंबलेल्या अवस्थेत आढळला.
मोबाइल गायब
सुप्रियाचा मोबाइल गायब झाला असून, तिच्या हरवलेल्या मोबाइलचा सीडीआर रिपोर्ट पोलिसांनी मागविला आहे. प्लास्टिकच्या दोन मोठ्या टॅगने तिचा गळा आवळण्यात आला आहे. तिच्या डोक्यावर गंभीर जखम आहे. प्रहार केल्यावर जमिनीवर उडालेले रक्त ज्या कापड्याने साफ केले, ते कापड घराच्या माळ्यावर सापडले.